जिल्हाभरात २१ दिवसांच्या गणरायाला निरोप

गणेशोत्सवाची सांगता, नवरात्रीचे वेध

रत्नागिरी:- गणेश चतुर्थीच्या दिवशी स्थानापन्न झालेल्या आणि तब्बल २१ दिवस गणेशभक्तांच्या घरी पाहूणचार घेतल्यानंतर जिल्ह्यात गुरुवारी वाजत-गाजत बाप्पांना निरोप देण्यात आला. गणपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या चे साकडे घालत गणेशभक्तांनी लाडक्या बाप्पाला निरोप दिला. २१ दिवसांच्या गणेश विसर्जनाने यावर्षीच्या गणेशोत्सवाची सांगता झाली.

गणेश चतुर्थीच्या दिवशी जिल्ह्यात सुमारे दीड लाखाहून अधिक घरगुती तर काही ठिकाणीच सार्वजनिक ठिकाणी गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. यानंतर दीड दिवसांच्या व नंतर पाच दिवसांच्या सर्वाधिक एक लाख मूर्त्यांचे विसर्जन करण्यात आले. अनंतचतुर्दशीच्या दिवशीदेखील मोठ्या प्रमाणावर बाप्पांना निरोप देण्यात आला होता.
 

गणेशोत्सवात अनेक गणेशभक्तांच्या घरी तब्बल २१ दिवसांसाठी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. जिल्ह्यातील अशा ७४ पेक्षा अधिक बाप्पांना गुरूवारी वाजत-गाजत निरोप देण्यात आला. यामध्ये रत्नागिरी शहर हद्दीतील ४ खासगी १ सार्वजनिक आणि ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १४, जयगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्वाधिक २९, नाटे  ७, देवरूख एक सार्वजनिक, गुहागर १० आणि पूर्णगड ८ अशा ७२ खासगी आणि २ सार्वजनिक गणेशमूर्त्यांचे गुरूवारी विसर्जन करण्यात आले. रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात विराजमान झालेल्या मानाच्या गणपतीचेही गुरूवारी विसर्जन करण्यात आले. या विसर्जन मिरवणुकीत पोलीस स्थानकातील कर्मचारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.