रत्नागिरी:-गणेशोत्सवासाठी मुंबई, पुण्यासह इतर जिल्ह्यातून 1 लाख 23 हजार 512 चाकरमानी दाखल झाले. त्यातील कोरोना चाचण्यांचे अहवाल असलेल्यांची संख्या 55 हजार 986 आहे. जिल्ह्यात आल्यानंतर केलेल्या चाचण्यांमध्ये 35 जणं कोरोना बाधित आढळले आहेत.
कोरोनातील परिस्थिती नियंत्रणात आल्यामुळे जिल्ह्यातील निर्बंध शिथिल करण्यात आले होते. त्याचा फायदा गणेशोत्सवासाठी गावी येणार्या चाकरमान्यांना झाला. जिल्हा प्रशासनाने लसीचे दोन डोस घेतलेले किंवा आरटीपीसीआर चाचणी केलेल्या चाकरमान्यांना प्रवेश देण्यात येईल असे आदेश काढले. त्यात सुधारणा करुन चाचण्यांची अट शिथिल करतानाच चाकरमान्यांची जबाबदारी ग्राम कृती दलाकडे सोपवण्यात आली. 8 सप्टेंबरपासून चाकरमान्यांची पावले कोकणाकडे वळू लागली. 10 सप्टेंबरला सर्वाधिक चाकरमान्यांनी रेल्वे, एसटीसह खासगी वाहनांमधून प्रवेश केला. चाकरमान्यांची नोंद करुन घेण्यासाठी जिल्ह्यात येणार्या चार मार्गांवर नोंदणी पथके ठेवण्यात आली होती. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात किती चाकरमानी आले ते समजू शकले.
गणेशोत्सवासाठी जिल्ह्यात सुमारे 1 लाख 23 हजार 512 चाकरमानी आले. त्यापैकी चाचणी करुन आलेल्यांची संख्या 42 हजार 374 आहे. यामधील 12 हजार 964 आरटीपीसीआर तर 29 हजार 410 अॅण्टीजेन चाचण्या झाल्या. जिल्ह्यात आल्यानंतर 13 हजार 612 जणांच्या चाचण्या झाल्या. त्यातील 35 जण कोरोना बाधित आढळले. त्यात लांजा व रत्नागिरीत प्रत्येकी 2, चिपळूण 9, गुहागर 12 आणि दापोलीत 10 जणांचा समावेश होता. बाहेरुन आलेल्यांपैकी कोरोना बाधित सापडणार्यांचे प्रमाणे नगण्य आहे.