जिल्ह्यात 4 लाख 62 हजार वीज ग्राहकांकडे 136 कोटीची थकबाकी

थकबाकी भरून सहकार्य करा- सहव्यवस्थापकीय संचालक प्रसाद रेशम

रत्नागिरी:- महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागात सर्व वर्गवारीतील (कृषिपंप ग्राहक वगळून) 50 लाख 19 हजार लघुदाब ग्राहकांकडील वीजबिलाची थकबाकी 3 हजार 562 कोटी रुपयांवर पोहचली आहे. महावितरणची सध्याची कठीण आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन ग्राहकांनी चालू वीज बिलासह थकबाकीचा भरणा करून सहकार्य करण्याचे आवाहन कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक (प्र) श्री. प्रसाद रेशमे यांनी केले आहे. तर वीजबिल वसुलीसाठी वीज पुरवठा खंडित करण्याची मोहिम तीव्र करण्याचे निर्देश देतानाच या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांविरूद्ध कडक कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

कोकण प्रादेशिक विभागात कल्याण, भांडुप, रत्नागिरी, नाशिक आणि जळगाव परिमंडलांचा समावेश होतो. महावितरणच्या दरमहाच्या एकूण महसुलात जवळपास ४० टक्क्यांपेक्षा अधिक योगदान देणारा हा विभाग असून या विभागातील थकबाकीचा वाढता डोंगर महावितरणच्या आर्थिक स्थितीवर गंभीर परिणाम करणारा ठरत आहे. परिणामी दैनंदिन खर्चासह, कर्मचाऱ्यांचे पगार, वीज खरेदीसारख्या अत्यावश्यक बाबींसाठी कर्ज काढण्याची वेळ महावितरणवर आली आहे. त्यामुळे उपलब्ध मनुष्यबळाचा कार्यक्षम वापर करून थकबाकी वसुलीच्या कामाला गती देत निर्धारित उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सहव्यवस्थापकीय संचालक सातत्याने मुख्य अभियंते, अधीक्षक अभियंते ते थेट कार्यकारी अभियंत्यांपर्यंत संवाद साधत वसुलीचा आढावा घेऊन आवश्यक निर्देश देत आहेत. 500 रुपयांपेक्षा अधिकची थकबाकी असणाऱ्या 20 लाख 71 हजार घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांकडून (2 हजार 909 कोटी रुपये थकबाकी) वसुली करावी अथवा त्यांचा वीजपुरवठा तातडीने खंडित करण्याचे आदेश सहव्यवस्थापकीय संचालकांनी दिले असून यात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा निश्चित असल्याचे सुतोवाच त्यांनी केले आहे. तर विनंती व पाठपुरावा करून पथदिवे आणि पाणीपुरवठा योजनांचे चालू वीजबिल वसूल करावेत. याशिवाय चालू वीजबिलाचा भरणा करणाऱ्या कृषीपंप ग्राहकांना थकबाकीत 66 टक्क्यांपर्यंत सवलत देणाऱ्या कृषिपंप धोरण 2020 योजनेचा लाभ देऊन थकबाकी वसुलीला चालना देण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

कोकण प्रादेशिक विभागात लघुदाब वर्गवारीतील 43 लाख 24 हजार घरगुती ग्राहकांकडे 739 कोटी, 5 लाख 23 हजार व्यावसायिक ग्राहकांकडे 306 कोटी, 1 लाख 4 हजार औद्योगिक ग्राहकांकडे 372 कोटी, 23 हजार 649 पाणीपुरवठा योजनांकडे 498 कोटी तर 44 हजार 754 पथदिवे जोडण्यांचे 1 हजार 646 कोटी रुपयांचे वीजबिल थकीत आहे. भांडूप परिमंडलात 10 लाख 32 हजार 612 ग्राहकांकडे 537 कोटी, कल्याण परिमंडलात 13 लाख 3 हजार 718 ग्राहकांकडे 553 कोटी, कोकण (रत्नागिरी) परिमंडलात 4 लाख 62 हजार 695 ग्राहकांकडे 136 कोटी, नाशिक परिमंडलात 12 लाख 24 हजार 319 ग्राहकांकडे 995 कोटी आणि जळगाव परिमंडलात 9 लाख 96 हजार 172 ग्राहकांकडे 1 हजार 341 कोटी रुपयांची वीजबिल थकबाकी आहे.