जिल्ह्यातील 3 हजार 207 शेतकरी झाले ऑनलाईन

रत्नागिरी:- पीक पेरा नोंदणीसाठी शासनाने ‘ई-पीक’ अ‍ॅप सुरू केले असून, रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत ३ हजार २०७ शेतकर्‍यांनी नोंदणी केली आहे. भौगोलिक परिस्थितीमुळे नेटवर्कची अडचण, ग्रामीण भागात अ‍ॅंड्रॉईड मोबाईल उपलब्ध नसणे किंवा तो हाताळता येत नसल्याने शेतकर्‍यांना नोंदणी करण्यात अडथळे येत आहेत. राज्यातील काही जिल्ह्यांच्या तुलनेत रत्नागिरीत कमी प्रतिसाद मिळत असला तरी कृषी विभागाकडून प्रचार-प्रसिद्धीवर भर दिला आहे.

शेतकरी घेत असलेली पिके, फळबाग, बांधावरची झाडे यांची ई-पीक अ‍ॅपवर प्रत्यक्ष शेतावर जाऊन नोंद घेण्यात येत आहे. पारदर्शकतेसाठी हे अ‍ॅप शासनाकडून विकसित केले आहे. यावर पिकाची माहिती भरण्यापूर्वी सर्व्हे नंबरची माहिती काढून ठेवावी लागते. शेत जमिनीची अचूक जागा, गाव नमुना आठ अ, सातबाराही आवश्यक असतो. शेतात मोकळ्या जागेत उभे राहून फोटो घेऊन अक्षांश व रेखांश घेतले जातात. कृषीसह महसूल विभागाकडून हे काम सुरू आहे. अ‍ॅपवर नोंदीसाठी अ‍ॅंड्रॉईड मोबाईल आणि इंटरनेटची गरज भासते. रत्नागिरी जिल्हा डोंगराळ भागात मोडत असल्याने अनेक गावात नेटवर्क नाही. मंडणगड, राजापुरात तर मोठीच अडचण आहे. त्यामुळे ‘ई-पीक’ नोंदीला कमी प्रतिसाद मिळत आहे. ग्रामीण भागात काही शेतकर्‍यांकडे साधे मोबाईल, काहींकडे मोबाईल आहेत पण चालवता येत नाहीत. या परिस्थितीत नोंदणीचे काम सुरू असून कृषी विभाग कार्यशाळा घेऊन शेतकर्‍यांना मार्गदर्शन करत आहे.
दरम्यान, राज्याच्या तुलनेत कोकणात कमी अंशी कमी नोंदणी झालेली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे तीन लाखाहून अधिक शेतकरी आहेत. त्यापैकी सव्वातीन हजार शेतकर्‍यांकडूनच नोंद झालेली आहे. नोंदणीत कुळवहिवाटीचाही प्रश्‍न निर्माण होत आहे. सिंधुदुर्ग, पालघरपेक्षा रत्नागिरी जिल्ह्यात चांगले काम झाले आहे.