गणपतीपुळेत पाचशे वर्षांपासून एक गाव एक गणपतीचा गजर 

रत्नागिरी:- एक गाव एक गणपती प्रथा गणपतीपुळे आणि परिसरातील गावांमध्ये गेली पाचशे वर्षे पाळली जात आहे. मागील वर्षी पासून कोविड 19 च्या प्रादुर्भावामुळे या प्रथेत खंड पडला आहे. गणेशभक्तांना दर्शनासाठी मंदिर खुले करणे अशक्य असल्यामुळे यावर्षी प्रत्येक गावातील केवळ 25 जणांना थेट तर इतर भक्तांसाठी देवस्थानतर्फे ऑनलाईन लाईव्ह दर्शन देण्याची व्यवस्था केली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे हे गणपतीचे जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. गावाच्या एकोप्यासाठी ‘एक गाव एक गणपती’ अशी संस्कृती राबवण्याचा प्रयत्न गेली 500 वर्ष सुरु आहे. मालगुंड, निवेंडी, गणपतीपुळे, नेवरे या परिसरातील ग्रामस्थ भाद्रपद मधील गणेश चतुर्थीला घरात गणपती आणत नाहीत. गेले कित्येक पिढ्या ही परंपरा सुरू आहे. कोकणात गणेशोत्सवात घरोघरी गणपती आणून त्याची मनोभावे पुजा-अर्चा करतात. त्या गावांमध्ये घरात नैवेद्य तयार करुन तो गणपतीपुळ्याच्या देवळात नेऊन दाखवला जातो. तेथील तिर्थ घरी आणून त्याची पुजा केली जाते. गतवर्षी पासून त्यावर कोरोनाचे सावट आले आहे. कोरोनामुळे परिस्थितीत संसर्ग टाळण्यासाठी पर्यटनस्थळे, मंदिरे दर्शनासाठी बंद ठेवण्यात आली. कोरोनाचा प्रभाव हळूहळू कमी झाला असला तरी अद्याप मंदिरे बंदच आहेत. समुह संसर्ग होऊ नये यासाठी प्रशासनाकडून कडक उपाययोजना केल्या जात आहेत. 

या ठिकाणच्या गावातील लोकं घरात गणपती न आणता मंदिरात जाऊन दर्शन घेतात. दर्शन घेतल्यानंतर मंदिरातील तिर्थ घरी नेऊन त्याचे पुढे पाच दिवस पुजन केले जाते. ही प्रथा गणपतीपुळेमध्ये कायम आहे. कोरोनामुळे मंदिरच बंद ठेवण्याचे शासनाचे आदेश आहेत. त्यामुळे या प्रथेत गतवर्षी पासून अडचणी निर्माण होत आहेत. दर्शनासाठी मंदिर उघडणे अशक्य असल्यामुळे त्यातून सुवर्णमध्य काढण्याचा प्रयत्न गणपतीपुळे मंदिर कमिटीकडून करण्यात आला आहे. गतवर्षी परंपरा कायम ठेवण्यासाठी गणपती मंदिरातून पुजा केलेले तिर्थ गावातील पाच लोकांना देण्यात आले होते.  यावर्षी प्रत्येक गावातील 25 जणांना गणपतीचे दर्शन देण्यात येणार आहे. इतर ग्रामस्थांना ऑनलाइन पद्धतीने दर्शनाची व्यवस्था करण्यात येणार आहे.