जैवविविधतेने नटलेल्या खानुतील वनउद्यानाची पर्यटकांना भुरळ 

रत्नागिरी:- तालुक्यातील खानु येथील वन उद्यानाने पर्यटकांना अक्षरशः मोहिनी घातली आहे. विविध प्रकारची फुले, वनस्पती यासह अनेक उपक्रम या ठिकाणी उभारण्यात आले आहेत. पर्यावरणाशी सांगड घालत पर्यटनाचा नवा पायंडा तालुक्यात पुढे आला आहे. 

 पर्यावरण संवर्धनासाठी पाच वर्षांपुर्वी रत्नागिरी तालुक्यातील खानू येथे स्व. उत्तमराव पाटील जैवविविधता वन उद्यान सामाजिक वनीकरण विभागाने विकसित केले आहे. भल्या मोठ्या जंगली वृक्षांबरोबरच अनेक वनौषधी, प्राणी, पक्षी यांचाही अधिवास आहे.

सामाजिक वनीकरण विभागाने खानू (ता. रत्नागिरी) येथे नोव्हेंबर 2015 ला हे उद्यान विकसित करायला घेतले. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले होते. पाली-खानू येथे मुंबई-गोवा महामार्गापासून काही अंतरावर उद्यानाचा परिसर सुरु होतो. लोखंडी तारांचे कुंपण घालून हा भाग संरक्षित केला आहे. या उद्यानात विविध प्रकारची फूल झाडे, औषधी वनस्पतींच्या सुमारे शंभरहून अधिक कुंडया ठेवण्यात आल्या आहेत. त्यात तुळस, पाणपोई, नरक्या, अडुळसा , भारंगी, शमी यांसारख्या रोपांची लागवड केली आहे. वनमहोत्सव योजनेतून बांबू, करंज, जांभूळ, सातविन, वड, कदंब, आंबा, चिकू, निव,काशिद,बकुल यांसारखी पाचशेहून अधिक झाडे लागवड केलेली आहेत. हॉर्नबिल (धनेश), घारीची घरटी, घुबड, खंड्या, कोकीळ यासह 70 ते 80 प्रकारचे पक्षी आहेत. सहा कुळातील फुलपाखरांचे वास्तव्य येेथे पहायला मिळते. हे वन उद्योन विकासासाठी सामाजिक वनीकरण विभागाकडून सुमारे वीस लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आतमध्ये सांबर 1, बिबटया 1, मगर 1, कोल्हा 1, ससा 4, चितळ 1 असे एकूण 9 पुतळे बसविण्यात आले आहेत. परिसर फिरुन दमलेल्या पर्यटकांसाठी 51 लाकडी बेंचेस बसवले आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी 5000 लिटरची पाण्याची टाकी उभी केली असून तेथे 4 नळ जोडण्या दिल्या आहेत. मोठे वेल चढविण्यासाठी तिन कमानी असून तिन डोम आणि जांभ्या दगडाचा 1200 मीटरचे निरीक्षण पथ तयार केला आहे.
दुर्मिळ वनस्पतींसह जुन्या वृक्षांचे संवर्धन वनोद्यानामध्ये केले आहे. अनेक शाळकरी मुलांच्या सहलींसह वनस्पती शास्त्राचे विद्यार्थीही या ठिकाणी अभ्यास करायला येतात असे निलेश कुंभार, सामाजिक वनीकरण यांनी सांगितले. तर संदिप कांबळे म्हणाले की वन विभागासह स्थानिक ग्रामस्थांनी खानू येथील वन उद्यानात नैसर्गिक अधिवास सांभाळला आहे. पर्यटकांसह अभ्यासकांना हे उद्यान पाहण्यासाठी आवडेल.