जिल्ह्यातील बहुतांश शिक्षकांना लसीचे दोन्ही डोस

रत्नागिरी:- जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शाळांतील १० हजार ३१८ एकूण शिक्षकांपैकी ९ हजार २७० शिक्षकांना दोन डोस देण्याची कार्यवाही पूर्ण झाली असल्याचे शिक्षण विभागाकडुन सांगण्यात आले.

शासनाकडून प्राथमिक व माध्यमिक शाळांतील शिक्षकांच्या लसीकरणाची धावपळ सुरू झालेली आहे. त्यासाठी राज्यांना ५ सप्टेंबरचे उद्दीष्ट देण्यात आलेले आहे. शिक्षक दिन साजरा करण्यापूर्वी देशातील सर्व शिक्षकांचं लसीकरण पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवा, अशा सूचना केंद्र सरकारने दिलेल्या आहेत. देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरण्याच्या मार्गावर आहे. ही लाट ओसरल्यानंतर देशातील अनेक राज्यांमध्ये शाळा सुरु होणार आहेत. गणेशोत्सवानंतर म्हणजेच सप्टेंबरच्या शेवटी किंवा ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्याचं नियोजन राज्यस्तरावर सुरु आहे. शिक्षकांचे लसीकरण पूर्ण करावे, अशा सूचना केंद्र सरकारकडून देण्यात आल्या आहेत. शिक्षकांचे लसीकरण अग्रक्रमानं करण्याच्या सूचना देतानाच राज्यांना लसींचा अतिरिक्त पुरवठा करणार असल्याचंही केंद्रीय आरोग्यमत्र्यांनी सांगितलं आहे. शिक्षकदिनापूर्वी सर्व शिक्षकांचं लसीकरण पूर्ण करण्यासाठीच या अतिरिक्त डोसचा वापर करण्याच्या सूचनाही राज्य सरकारांना करण्यात आल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्वयाचा विचार करता आतापर्यंत १० हजार ३१८ शिक्षकांची संख्या असून त्यापैकी ९,२७० शिक्षकांचे दोन डोसचे लसीकरण पूर्ण झाले असल्याचे सांगण्यात आले. त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या ५,४८३ तर खासगी शाळांच्या ३७८७ शिक्षकांचे लसीकरण पूर्ण झाले आहेत.