सात महिन्यात 59 अपघातांमध्ये 61 जणांचा मृत्यू
रत्नागिरी:- जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग, राज्यमार्ग आणि अंतर्गत मार्गांवर जानेवारी ते जुलै या सात महिन्यात ५९ अपघातांमध्ये तब्बल ६१ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. सात महिन्यात ६१ जणांना रस्ते अपघातात बळी गेला असला तरी गतवर्षीपेक्षा अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. गतवर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आले होते. त्यामुळे अपघाताच्या संख्येत मोठी घट झाली होती.
कोकण रेल्वेचे आगमन झाल्यानंतर मुंबई-गोवा महामार्गावरील वाहनांची वर्दळ काही प्रमाणात रोडावली. मात्र लॉकडाऊनचा कालावधी वगळता मागील काही वर्षांपासून रस्त्यांवरील वाहतुकीने पुन्हा गती आली आहे. कोकणात येणाऱ्या तसेच गोव्याकडे जाणाऱ्या गाड्यांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाणही तेवढेच वाढले होते.कोरोनामुळे मार्च २०२० मध्ये देशात लॉकडाऊन सुरु झाले होते. सन २०२० मध्ये काही महिने जिल्हा बंदी असल्याने वाहनांची वाहतूक पुर्णत: ठप्प झाली होती. गतवर्षी अपघातांच्या संख्येत मोठी घट झाली होती.
सन २०२१ मध्ये जानेवारी ते जूलै या कालवधीत एकूण २०१ अपघात झाले. त्यापैकी ५९ अपघातात ६१ जणांचा बळी गेला. जानेवारी माहिन्यात ९, फेब्रुवारी ९, मार्च ९, एप्रिल ७ , मे १३, जून १०, जुलै ४ अशा मृतांचा समावेश आहे. एकूण २०१ अपघातामध्ये ५९ फेटल अपघातात ६१ जणांचा मृत्यू झाला आहे. ६६ अपघातात १७६ जण गंभीर जखमी झाले तर ४५ अपघातात ११२ जण किरकोळ जखमी झाले आहे. तर ३१ अपघातात केवळ वाहनांचे नुकसान झाले आहे.
कोरोनाचा निर्बंध शिथील झाल्याने पुन्हा वाहतूक सुरु झाली आहे.पर्यटनासाठी कोकणात येणार्या पर्यटकांसह आता गणेशोत्सवात चाकरमान्यांच्या वाहनांची मोठी गर्दी महामार्गावर पहायला मिळणार आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरु असले तरी आरवली ते भाबेंड या भागातील काम अध्याप संथ गतीने सुरु आहे. त्यामुळे भागातील अवघड वळणे आजही आपघाताला कारणीभूत ठरत आहेत.