जिल्हाध्यक्षांचे आदेश ; नीलेश भोसलेच शहराध्यक्ष, अभिजित गुरवांकडे पद नाही
रत्नागिरी:-राष्ट्रवादीत पोरखेळ सुरू आहे का, कोणीही उठतो आणि काही बोलतो. पक्षप्रवक्ते संजय तटकरे यांच्या उपस्थितीत शहरामध्ये आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिलिंद कीर यांच्या नेतृत्वाखाली वॉर्डनिहाय काम करण्याच्या सूचना होत्या. आयत्यावेळी त्यांचे नाव वगळण्यात आले. मनू गुरव यांनी अचानक मीच रत्नागिरी शहराध्यक्ष असल्याचा दावा केला. या उलटसुलट चर्चा आणि बातम्यांमुळे संभ्रम निर्माण होत आहे. कोणीतरी पक्षात फुट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचा तत्काळ बंदोबस्त करा, असे आदेश जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांनी दिल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते कुमार शेट्ये यांनी दिली.
येथील राष्ट्रवादीच्या संपर्क कार्यालयात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी उपजिल्हाध्यक्ष मिलिंद कीर, शहराध्यक्ष नीलेश भोसले, बंटी वणजू आदी उपस्थित होते. ते म्हणाले, पक्षाचे प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे रत्नागिरी दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांच्या उपस्थितीत पालिका निवडणुकीचे धोरण जाहीर केले. महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्हाला सन्मानपूर्वक जागा मिळाल्या तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूका लढायच्या किंवा न मिळाल्यास स्वबळावर लढण्याचे जाहीर केले. ज्येष्ठ नेते राजाभाऊ लिमये, कुमार शेट्ये यांच्या मार्गदर्शनाखाली मिलिंद कीर यांच्या नेतृत्वाखाली शहरात निवडणुकीचे काम करण्याचे आदेश दिले होते. कीर यांनी पोटनिवडणुकीत पक्षाच्या चिन्हावर सन्मानजनक मते मिळवली होती. म्हणून त्यांना ही संधी देण्यात आली. तसेच निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी बशीर मुर्तुझा, नगरसेवक सुदेश मयेकर, मिलिंद कीर व शहराध्य नीलेश भोसले यांची समिती काम करेल, असे घोषित केले होते. मात्र आयत्यावेळी कीरांचे नाव बाजूला केल. यामुळे कार्यकर्ते आणि जनतेमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण करण्यात आले.
नीलेश भोसले यांची २०१९ मध्ये पक्षाने रत्नागिरी शहराध्यक्ष म्हणून निवड केली आहे. तसे नियुक्ती पत्र आमच्याकडे आहे. असे असताना अभिजित उर्फ मनू गुरव यांनी आपणच शहराध्यक्ष असल्याचे दावा करून दुसरा संभ्रम निर्माण केला. याची गंभीर दखल जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांनी घेतली. त्यांनी संबंधितांना फोन करून हा काय पोरखेळ सुरू आहे का, असे सुनावत नीलेश भोसले हेच रत्नागिरी शहराचे अधिकृत शहराध्यक्ष असल्याचे जाहीर केले. पक्षाची बदनामी करणे आणि फुट पाडण्याचा हा प्रयत्न आहे. जे कोण यात आहेत त्यांचा तत्काळ बंदोबस्त करा, अशा सूचना देऊन पत्रकार परिषद घेण्याची सूचना केल्याचे कुमार शेट्ये यांनी सांगितले.