जिल्ह्यासाठी ६ लाख ३० हजार ८३३ मोफत पाठ्यपुस्तके उपलब्ध 

रत्नागिरी:- महापूरामुळे जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचा पुरवठा करण्यात अडथळा निर्माण झाला होता. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर पुस्तके आणण्याची कार्यवाही सुरु झाली आणि जिल्ह्यासाठी शासनाकडून ६ लाख ३० हजार ८३३ पुस्तके प्राप्त झाली आहेत. चिपळूण तालुका वगळता प्रत्येक तालुक्यात संचाचे वितरण होणार असल्याचे जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

कोरोना टाळेबंदीमुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास ऑनलाईन सुरू झाला. शासनाच्या माध्यमातून दरवर्षी मराठी आणि उर्दू शाळांतील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात येते.  शाळेचे सत्र सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी या पाठ्यपुस्तकांचे वितरण होते. त्यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत मोफत पाठ्यपुस्तकांची मागणी नोंदविण्यात आली होती. जिल्ह्यात १ लाख १३ हजार १५३ विद्यार्थ्यांसाठी ६ लाख ३० हजार ८३३ पुस्तकांची मागणी होती. मात्र शासनाकडून होणार पुरवठा २२ जुलै दरम्यान झालेल्या अतिवृष्टी व महापूरामुळे थांबवण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना पुस्तकांची प्रतिक्षा लागून राहिलेली होती. शासनाकडून प्राप्त झालेली पाठपुस्तके प्रत्येक तालुकास्तरावर वितरीत करण्यात आली आहेत. तालुकास्तरावर त्या पुस्तकांचे वितरण बीटस्तरावर करण्याच्या सूचना शिक्षण विभागाने केल्या आहेत. चिपळूण तालुक्याला प्राप्त झालेल्या पाठपुस्तकांचे महापुरात नुकसान झाले आहे. त्या तालुक्यासाठी नव्याने संच मागविण्यात आले आहेत.