रत्नागिरीत 11 रस्त्यांच्या खड्डेभरणीला अखेर मुहूर्त

निविदा न भरल्याने पालिकाच करणार काम

रत्नागिरी:-शहरातील प्रमुख रस्त्यांवरील खड्डे डांबराने भरण्याचे काम मंगळवार पासून सुरू होणार आहे. प्रमुख ११ रस्त्यांवर हे पॅचिंगचे काम होणार असून त्यासाठी दोन टीम बनवण्यात आल्या आहेत. उन्हाळी आणि पावसाळी डांबराने खड्डे भरले जातील. डांबराचे दर पंधरा दिवसाला वाढत असल्याने कोणताही ठेकेदार या निविदा भरण्यास तयार झाला नाही. त्यामुळे पालिकेने स्वतः हे काम करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांनी दिली.  

शहरातील खड्ड्यांची वाताहत झाली आहे. सर्वच रस्ते खड्ड्यात गेले आहेत. डांबरीकरणासाठी सुमारे १० कोटीच्या ४७ रस्त्यांची वर्कऑर्डर दिली आहे; मात्र पावसामुळे हे काम मागे पडले. रस्त्यांबाबत वाहनधारक आणि नागरिकांच्या प्रचंड तक्रारी आहेत. काही राजकीय पक्षांनी आंदोलनही केले. परंतु पाऊस संपल्यानंतर ही १० कोटी रस्त्यांची कामे करण्यात येणार आहेत. आता केली तर पावसामुळे पु्न्हा रस्ते खराब होऊन पैसा वाया जाण्याची शक्यता आहे; मात्र नागरिकांना आणि वाहनधारकांना खड्ड्यांचा प्रचंड त्रास होत आहे. याबाबत पालिकेची भूमिका स्पष्ट करताना साळवी म्हणाले, गणेश आगमन आणि विसर्जनासाठी ज्या मार्गांवर गर्दी असते अशा रस्त्यांवरील खड्डे भरण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. यामध्ये रामनाका, गोखले नाका, बंदर रोड, तेलीआळी, धनजी नाका ते राधाकृष्ण नाका, गाडीतळ, परटवणे, निवखोल रोड, घुडेवठार, चवंडेवठार ते मांडवी, आठवडा बाजार येथील प्रमोद महाजन क्रीडा संकुल मार्ग, राम मंदिर ते पेठकिल्ला, धनजीनाका ते जयस्तंभ या मार्गांवरील खड्ड्यांचा समावेश आहे.