विमानतळाच्या भूसंपादनासाठी केंद्राच्या सुधारित दरानुसार मोबदला मिळावा 

रत्नागिरी:- रत्नागिरी शहराजवळील विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी वाढीव भूसंपादन केले जात आहे. त्यासाठी गुंठ्याचा दर पावणेसहा हजारापर्यंत दिला जाणार आहे. केंद्राच्या प्रकल्पांना सुधारीत दराप्रमाणे मोबदला दिला जात असताना विमानतळाला कमी मोबदला का असा प्रश्‍न तिवंडवाडी ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. यासंदर्भात पालकमंत्री अ‍ॅड. अनिल परब यांना निवदेन देण्यात येणार आहे.

तिवंडेवाडी येथील जमिन विमानतळ व तटरक्षक दलासाठी संपादीत केली जाणार आहे. तिवंडेवाडीतील मिळकती या हातखंबा ते मीर्‍याबंदर सागरी महामार्गाला लागून आहेत. हा महामार्ग शिरगांवमधूनच जाणार आहे. नगरपालीकेच्या हद्दीपासून जेमतेम 1 किलोमीटरमध्ये आहे. तिवंडेवाडीमधील मिळकतींना तुकडे जोड कायदा लागू होत नाही. काही ग्रामस्थांच्या सात बारा वर तटरक्षक दलाचे नाव लावण्यात आले आहे.

येथील जमिनींचा रेडीरेकरनचा दर हा प्रति गुंठा सुमारे 5 हजार 732 प्रमाणे आहे. प्रत्यक्षात सागरी महामार्गाच्या भागातच उद्यमनगरकडील जमिनी लाखो रुपये गुंठ्याने विक्रीला जात आहेत. पुढे गोडबोले स्टॉपकडील भागातील जमीनींचे दर गगनाला भिडलेले आहेत. तुलनेत विमानतळासाठी संपादित होत असलेल्या जमिनींचे दर अत्यंत कमी आहेत. तसेच केंद्राच्या प्रकल्पाप्रमाणे चौपदरीकरणाबाबतचाही दर देणे आवश्यक आहे. तटरक्षक दल हा देखील केंद्राचाच प्रकल्प आहे. त्यामुळे सुधारीत दराचा विचार होणे आवश्यक आहे.
येथील विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी गेल्या 2019 मध्ये भूसंपादनाची कार्यवाही करण्यात आली होती. त्यावेळी ग्रामस्थांना विश्वासात न घेतल्याने लगतच्या शिरगांव व मिरजोळे वासियांनी त्या कार्यवाहीला आक्षेप घेतला होता. कारण यापूर्वी देखील या विमानतळासाठी, येथील एमआयडीसीसाठी व अन्य पकल्पांसाठी ग्रामस्थांच्या जमिनी संपादीत करण्यात आल्या. पण ग्रामस्थांच्या मागण्या, त्यांच्या योग्य पुर्नवसनाचा विचार न होता त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत. त्यामुळे जागा संपादनाची कार्यवाही करण्यापूर्वी शिरगाव व मिरजोळे या दोन्ही ग्रामस्थांची संयुक्त बैठक घ्या, त्यांना विषय समाजावून सांगा, मते जाणून घ्या. त्याशिवाय जागांची मोजणी करू नका अशी ठाम भूमिका तत्कालीन प्रांताधिकार्‍यांकडे मांडण्यात आली होती.