डोंगराला भेगा; 9 कुटुंबांना स्थलांतराच्या सूचना
रत्नागिरी:- तालुक्यातील हरचेरी बौध्दवाडी व चिंद्रवली येथील जमीन खचली असून भेगाही पडल्या आहेत. धोकादायक असलेल्या भागातील 9 कुटुंबाना तात्काळ स्थलांतर करण्याच्या सूचना तहसीलदार शशिकांत जाधव यांनी दिल्या आहेत. तसेच खचलेल्या भागाजवळ चिंद्रवली येथील रेल्वे बोगद्याच्या वरच्या डोंगर भागात काही ठिकाणी भेगा पडलेल्या आहेत.
तहसीलदार श्री. जाधव यांनी आज घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी हरचेरी सरपंच, स्थानीक पंच, हरचेरी बौध्दवाडी येथील नागरीक, मंडल अधिकारी खेडशी, तलाठी हरचेरी, तलाठी उमरे, ग्रामसेवक हरचेरी, सरपंच चिंद्रवली व स्थानीक चंद्रवली नागरीक उपस्थित होते.
जुलै महिन्यात अतिवृष्टी झाली होती. त्यात जिल्ह्यात ठीक ठिकाणी दरड कोसळून मोठे नुकसान झाले. पोसरेतही सतरा जण मृत पावले. रत्नागिरी तालुक्यातील हरचेरी बौध्दवाडी येथेही डोंगर भागात गतवर्षी पडलेल्या भेगा होत्या. त्याठिकाणी एकुण 70 घरे आहेत आणि या भागातील डोंगराला काही ठिकाणी भेगा पडलेल्या आहेत. 2019 मध्ये या परिसरातील ज्या ठिकाणी भेगा पडलेल्या होत्या. त्या ठिकाणी काही प्रमाणात जमीन खचली आहे. तसेच काही ठिकाणी भेगांचे प्रमाण वाढलेले आढळले आहे. या धोकादायक ठिकाणी 9 कुटुंब आहेत. त्यांना स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ज्या कुटुंबाचे राहण्याची व्यवस्था नाही, त्यांची जवळच्या शाळेत व्यवस्था करण्यात येईल असे सबंधीतांना सांगण्यात आले आहे. या खचलेल्या भागा पासून काही अंतरावर चिंद्रवली येथील रेल्वे बोगद्याच्या वरच्या डोंगर भागात काही ठिकाणी भेगा पडलेल्या आहेत. त्याची सुध्दा पाहणी करण्यात आली. या भागात असणारा रेल्वे बोगदा आणि महावितरणचे मोठे टॉवर आहेत. बोगद्या जवळील भाग धोकादायक असल्यामुळे संबंधित प्रशासनाला याबाबतच्या सूचना तलाठी श्री. सुळ यांनी लेखी कळविले आहेत.









