रत्नागिरी:- कोरोनाचा प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेच्यावतीने घेण्यात येणारी इयत्ता पाचवीची पूर्व उच्च पाथमिक शिष्यवृत्ती आणि आठवी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षां येत्या 8 ऑगस्ट रोजी घेण्याचे निर्देश राज्य शासनाच्या शिक्षण विभागस्तरावरून देण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात इ. 5 वी चे 7775 विद्यार्थ्यांसाठी 90 परिक्षा केंद्रे तर इ. 8 वी चे 3,657 विद्यार्थी 49 परिक्षा केंद्रांवर या परिक्षेला बसणार आहे.
शिष्यवृत्ती परिक्षा 25 जुलै रोजी घेण्यासंदर्भात राज्य परिक्षा परिषदेने अहवाल मागवले होते. मात्र कोरोना नियमांचे पालन करीत या परिक्षा घेणे अडचणींचे असल्याचे शिक्षण तज्ञांनी मत व्यक्त केलेले होते. त्यामुळे या वर्गांच्या शिष्यवृत्ती परिक्षा होणार की नाही यावर अनिश्चितेचे ढग पसरलेले होते. गेल्या दिड वर्षांपासून विद्यार्थ्यांनी या परिक्षेसाठी अभ्यासही केला आहे. पण परिक्षा झाल्या नसल्याने पालक, विद्यार्थी संभ्रमात होते. इयत्ता पाचवीची पूर्व उच्च पाथमिक शिष्यवृत्ती व आठवीची पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षा 23 मे रोजी होणार होती.
यादृष्टीने केंद्रसंचालक, पर्यवेक्षक नियुक्ती, परिक्षा केंद्र निश्चिती करण्यात आली होती. मात्र दहावी-बारावीची परिक्षा रद्द केल्याने या परिक्षा कशा घ्यायच्या असा पेच राज्य सरकारसमोर उभा रहिला होता. त्यामुळे तज्ञांशी चर्चा करून शिष्यवृत्ती परिक्षा कोरोनाचा पार्दुभाव कमी झाल्यानंतर घेण्याची घोषणा करण्यात आली. या शिष्यवृत्ती परिक्षांमधूनच विद्यार्थ्याच्या बुध्द्याकांचे मुल्यमापन केले जाते. त्यामुळे ही परिक्षा होणेही तितकेचे गरजेचे आहे. याचा विचार करून शासनाच्या शिक्षण विभागाने येत्या 8 ऑगस्ट रोजी शिष्यवृत्ती परिक्षा घेण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्यामुळे शाळास्तरांवरून विद्यार्थ्यांची पुन्हा ऑनलाईन उजळणी सुरू आहे.









