जिल्ह्यात 22 जुलैपर्यंत अतिमुसळधार  

रत्नागिरी:-जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. रत्नागिरी, राजापूर, दापोली आणि संगमेश्‍वरात नद्यांना पूर आला आहे. आंबा घाटात दरड कोसळली असून पुराच्या पाण्यामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्हयात 22 जुलैपर्यंत अतिमुसळधार पावसाची स्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. नागरिकांनी सावध रहावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

सोमवारी (ता. 19) सकाळी 8.30 वाजेपर्यंतच्या चोविस तासात जिल्ह्यात सरासरी 130.99  मिमी पावसाची नोंद झाली. त्यात मंडणगड 146.60, दापोली 183.20, खेड 115.90, गुहागर 144.20, चिपळूण 104.30, संगमेश्वर 97.90, रत्नागिरी 127.40, राजापूर 136.40, लांजा 123 मिमी पाऊस झाला. रविवारी रात्रभर मुसळधार पाऊस पडता होता. रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावरील आंबा घाटात दरड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. ती दरड काढण्याचे काम युध्दपातळीवर सुरु होते. चार तासानंतर येथील वाहतूक सुरळीत झाली. संगमेश्‍वर तालुक्यातील गडनदीला आलेल्या पुरामुळे किनारी भागातील पूर खोतजुवा, मसुरकर जुवा येथील घरांना धोका निर्माण झाला होता. सकाळी पाणी ओसरु लागले, पण पुन्हा पावसाने सुरवात केल्यामुळे धोका वाढला होता. राजापूरात साखर कोंब-भंडारवाडी येथे जमिनीचा भाग खचला असून वाडीतील घरांना धोका निर्माण झाला आहे. अर्जुना आणि कोदवली नदयांना पूर आला असून पुराच्या पाण्याने पुन्हा एकदा शहर बाजारपेठेत पुराच्या पाण्याने शिरकाव केला आहे. रायपाटण गांगणवाडी येथुन एक वृध्द व्यक्ती अर्जुना नदीतून वाहून गेला आहे. धाऊ लवल्ली-आंबेलकरवाडी हा मुख्य रस्ता खचला असून कुवेशी येथे वहाळ फुटुन वहाळाचे पाणी घरात घुसले.

रत्नागिरी तालुक्यात धामणसे, चाफे येथील भातशेती पुराच्या पाण्यात वाहून गेली होती. त्यामुळे 12 शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. पावस येथील गौतमी नदीचे पाणी किनारी भागातील शेतात साचून राहीले आहे. रत्नागिरीतील काजळी नदीही दुथडी भरुन वाहत आहे. पावसामुळे दापोली दाभोळ येतील काशिनाथ जोशी यांच्या घराशेजारी दरड कोसळल्याने घराचे अंशत: 22 हजार रुपयांचे नुकसान झाले. खेड तालुक्यात पावसामुळे जगबुडी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढली आहे. खेड शहरात अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले असून गटारे देखील तुडुंब भरून वाहत आहेत. शहरातील तीनबत्ती नाका, कॅफे कॉर्नर, महाडनाका या परिसरात गटारे ओसंडून वाहू लागल्याने खेड-भरणे व खेड-दापोली मार्गावर पाणीच पाणी साचले होते.