चौपदरीकरणाचे काम डिसेंबर 2022 पर्यंत पूर्ण करा; उच्च न्यायालयाच्या सूचना

रत्नागिरी:-मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम डिसेंबर 2022 पर्यंत पूर्ण करा अशा सुचना उच्च न्यायालयाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या आहेत. त्यामुळे काही टप्प्यात थांबलेल्या चौपदरीकरणाच्या कामांना गती मिळण्याची शक्यता आहे. सध्या चौपदरीकरणाचे 62 टक्के काम पूर्ण झाल्याचे बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले.

चिपळूण येथील अ‍ॅड. ओवेस पेचकर मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासंदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यावर 8 जुलैला सुनावणी झाली. त्यामध्ये महामार्गावरील खड्डे तत्काळ भरावेत आणि चिपळूण येथील वाशिष्ठी पुलावर सुरक्षिततेसाठी रिफ्लेक्टर इंडीकेटर, सेफ्टी लाईट लावण्यात यावेत अशा सुचना दिल्या आहेत. त्यानुसार बांधकाम विभागाकडून कार्यवाही सुरु झाली आहे. सध्याच्या परिस्थितीत वाशिष्ठी पूलाचे काम 31 जुलैपर्यंत पूर्ण होईल अशी शक्यता आहे. पुढील महिन्यात नवीन पुलावरुन वाहतूक सुरु होण्याची शक्यता आहे. साडेतीनशे किलोमीटरचे चौपदरीकरण दहा टप्प्यात केले जात आहे. त्यातील बावनदी ते वाकेडचे कामाला दिरंगाई होत आहे. आरवली ते बावनदी या टप्प्यातील कामाला पावसाळा गेल्यानंतर वेग येईल. एकुण 350 किलोमीटरपैकी 183 किलोमीटरचे काँक्रिटीकरण पूर्ण झाल्याचे बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले. संपूर्ण चौपदरीकरण पूर्ण करण्यासाठी डिसेंबर 2022 ची डेडलाईन असून त्यादृष्टीने कामे वेगाने व्हावीत यासाठी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनीही महत्त्वपूर्ण सुचना दिल्या आहेत. दरम्यान, बांधकाम विभागाकडून महामार्गावर 12 टक्के ठिकाणी खड्डे असल्याचे स्मरणपत्र न्यायालयात सादर करण्यात आले आहे. पाऊस थांबल्यानंतर ते खड्डे बुजवण्याची मोहीम हाती घेण्यात येणार आहे.