रत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी येणारी खर्चाचा पूर्ण निधी अद्याप पर्यंत नगर परिषदेकडे प्राप्त नाही. त्यामुळे या कामाची निविदा भरण्यासाठी कोणताही मोठा विकासक पुढे आला नसल्याचा अंदाज आहे. 25 दिवसांत एकही ठेकेदाराने निविदा न भरल्याने शासनाकडे या कामासाठी लागणारा उर्वरित निधी लवकरात लवकर द्यावा अशी मागणी करण्यासाठी नियोजन केले जात आहे.
रत्नागिरी नगर परिषदेची नवीन प्रशासकीय इमारत बांधण्यासाठी 14 कोटी रुपयांचा निधी अपेक्षित आहे. वैशिष्ट्यपूर्ण निधीतून हे इमारतीचे काम केले जाणार आहे. सद्यस्थितीत रनपकडे 5 कोटी रूपयांचा निधी प्राप्त असून, वस्तू व सेवा कर धरून एकूण खर्च सुमारे 14 कोटी रूपये इतका आहे. रनपकडे 5 कोटी रुपयांचा निधी जमा असतानाच इमारत बांधकामाची निविदा मागवण्यात आली. परंतु, निविदा भरण्याच्या 25 दिवसात एकही निविदा आली नाही. राष्ट्रीय, राज्य, स्थानिक वृत्तपत्रातून निविदा मागवूनही एकही विकासक पुढे आला नाही. त्यामुळे या नवीन प्रशासकीय इमारतीच्या उभारणीला विलंब होणार आहे.
इमारत बांधकामासाठी लागणारा संपूर्ण निधी रत्नागिरी नगर परिषदेकडे प्राप्त नसल्यानेच कोणीही विकासक पुढे आला नसावा, असा तर्क लावला जात आहे. त्यानुसार आता शासनाकडे संपूर्ण निधीची मागणी करण्याची तयारी केली जात आहे.शासनाने या कामासंदर्भात आवश्यक कार्यवाही करून घेण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार निविदा प्रक्रिया करण्यात आली. परंतु, एकही निविदा आली नाही. शासनाकडे इमारतीच्या बांधकामासाठी लागणारा संपूर्ण निधी मागण्यासाठी नियोजन केले जात आहे. अशावेळी मागणी झाल्यानंतर शासनाकडून निधी मिळेल, या अपेेक्षेने पुनर्निविदेची प्रक्रिया केली जात आहे.