जिल्ह्यात नव्याने 524 रुग्णांची नोंद तर सात रुग्णांचा मृत्यू

रत्नागिरी:- जिल्ह्यात नव्याने आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 24 तासात 444 आणि त्यापूर्वीचे 80 असे एकूण 524 नवे पीझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. याच कालावधीत सात जणांचा मृत्यू झाला आहे. नवे 524 रुग्ण सापडल्याने एकूण रुग्णसंख्या 62 हजार 100 झाली आहे.

मंगळवारी आलेल्या अहवालात बाधितांच्या संख्येसह मृत्यूच्या संख्येत मोठी वाढ झाली होती. मंगळवारी 554 नवे कोरोना रुग्ण आणि 33 मृत्यू झाले होते. मंगळवारी मृत्यूसंख्येत घट झाली आहे. 

मागील काही दिवस रुग्णसंख्या नियमितपणे 500 च्या दरम्यानच आहे. सोमवारी 5 हजार 398 चाचण्या करण्यात आल्या होत्या. यात 331 जण बाधित सापडले होते. मंगळवारी 4 हजार 725 चाचण्या करण्यात आल्या असून यात 431 तर त्यापूर्वीचे 123 असे एकूण 554 जण कोरोना बाधित सापडले आहेत. बुधवारी 5 हजार 564 चाचण्या करण्यात आल्या असून यात 444 आणि त्यापूर्वीचे 80 असे 524 बाधित रुग्ण सापडले आहेत. यात आरटीपीसीआर चाचणी केलेल्या 2 हजार 383 पैकी 230 तर अँटीजेन चाचणी केलेल्या 3 हजार 181 पैकी 214 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. नव्याने सापडलेल्या 524 रुग्णांमुळे जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट 7.98 टक्के इतका झाला आहे. मंगळवारी 202 रुग्ण बरे झाले. जिल्ह्याचे कोरोनामुक्तीचे प्रमाण 87.24 टक्के आहे. 

जिल्ह्यात 24 तासात 7 जणांचा मृत्यू झाला आहे. यात रत्नागिरी तालुक्यात 2, चिपळूण 1, संगमेश्वर 1, दापोली 1, मंडणगड 1 आणि राजापूर तालुक्यात 1 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 7 जणांच्या मृत्यूंमुळे जिल्ह्याचा मृत्युदर वाढून 2.86 टक्क्यांवर पोहचला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 हजार 778 मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.