जिल्हा परिषदेसमोर आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांचे आंदोलन

रत्नागिरी:- महाराष्ट्र राज्य आशा स्वयंसेविका-गट प्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्यावतीने रत्नागिरी जिल्ह्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांसमवेत रत्नागिरी जिल्हा परिषदेसमोर बुधवारी आंदोलन छेडण्यात आले. यावेळी आशा स्वयंसेविकांनी सरकार विरोधात घोषणा दिल्या. 

मार्च २०२० पासून ग्रामीण व शहरी भागात आशा व गटप्रवर्तकांची प्राथमिक आरोग्य केंद्र, लसीकरण केंद्र व क्वारंटाईन कैम्प येथे सकाळपासून आठ तासांची ड्युटी लावण्यात आली आहे. काही ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र व गृह भेटींमध्ये आशा स्वयंसेविकांना कोरोना संशयित व्यक्तींची पल्स रेट, थर्मल गन ने तपासणी करावी लागते. या कामा करिता त्यांना केंद्र सरकारने दिलेला दरमहा १००० रुपये विशेष भत्ता देण्यात येतो. म्हणजेच त्यांना ३५ रुपये प्रतिदीन भत्ता देण्यात येतो. महाराष्ट्र सरकार आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना प्रतिदीन ८ तासाच्या कोरोना संबंधित कामाकरिता काही मानधन देत नाही. महाराष्ट्र सरकार आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांना वेठबिगारांसारखे वागवून त्यांच्याकडून सक्त मजुरी करुन घेत असल्याचे या आशा स्वयंसेविकांचे आहे. अशा विविध मागण्यांच्या संदर्भात रत्नागिरी जिल्ह्यातील आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांनी रत्नागिरी जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलन छेडले.