धोकादायक! समुद्रातील मासळीचा साठा घटून 66 टक्क्यांवर 

मानवी हस्तक्षेप आणि नैसर्गिक बदलाचा परिणाम 

रत्नागिरी:- समुद्रातील माशांचा साठा कमी होत असून तो सध्या 66 टक्केवर पोचला आहे. त्याला मानवी हस्तक्षेपाबरोबरच नैसर्गिक बदलही कारणीभूत आहेत. खोल समुद्रातील ऑक्सीजन कमी असलेला झोन प्रवाहाबरोबर किनार्‍याकडे येतो. त्यामुळे मासे स्थलांतर करतात आणि त्याचा परिणाम मत्स्योत्पादनावर होऊ शकतो असे प्रतिपादन नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीचे वरिष्ठ वैज्ञानीक डॉ. अभय बी. फुलके यांनी केले.

जागतिक महासागर दिनानिमित्त रिलायन्स फाउंडेशन, भारतीय तटरक्षक दल आणि राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युट्युब लाईव्ह कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी डॉ. फुलके यांनी जीवन व उपजीविका, सागराचे महत्व, महासागराचे प्रदूषण व उपाय, तसेच मत्स्यासाठा कमी होण्याचा नैसर्गिक कारण या विषयी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, समुद्रातून 50 टक्के तर उर्वरित झाडापासून ऑक्सीजन मिळतो. त्यामुळे दैनंदिन जीवनात झाडांचे आणि समुद्राचे महत्व अधिक आहे. सागरी किनार्‍यावरील मच्छीमार बंधूनी किनारे सुरक्षित ठेवण्यासाठी पुढाकार घेतला पाहीजे. प्रदुषणाला आळा घालण्यासाठी तेथील वातावरण शुध्द ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहीजे. सागरी वातावरण शुध्द राहीले तर मत्स्योत्पादनात भर होऊ शकते. मत्स्योत्पादन कमी होण्यासाठी नैसर्गिक आणि मानवनिर्मित कारणे आहेत. नैसर्गिक कारणांमध्ये ऑक्सीजन कमी असलेला झोन मासे मिळणार्‍या भागांमध्ये येणे याचा समावेश आहे. खोल समुद्रात हजारो किलोमीटरवर कमी ऑक्सीजन असलेले झोन आढळतात. ते पाण्याच्या प्रवाहाबरोबर किंवा हवेमुळे किनार्‍याकडे येतात. नियमित मासे सापडणार्‍या किनारी भागात तो आला तर त्याचा प्रभाव माशांवर होतो. त्यामुळे दरवर्षी मासे मिळणार्‍या किनारी भागात ते मिळत नाहीत. माशांना ऑक्सीजन कमी मिळत असल्यामुळे ते अन्यत्र निघुन जातात.