रत्नागिरी:- येथील युवा उद्योजक सौरभ मलुष्टे यांनी आरोग्य विभागाच्या सहकार्याने ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांग यांच्यासाठी आयोजित मोबाईल व्हॅनद्वारे लसीकरणाच्या पहिल्या दिवशी शहरातील शिवाजीनगर येथे ५० लाभार्थींना लस देण्यात आली.या उपक्रमाअंतर्गत पहिल्या दिवशी लसीकरण मोबाईल व्हॅन शिवाजीनगर येथे नेण्यात आली. त्याच भागात रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघाने सभागृह उपलब्ध केल्याने लसीकरणासाठी नाव नोंदवून आलेल्या नागरिकांना अत्यंत शिस्तबद्धपाणे कोविड प्रतिबंधक कोव्हीशिल्डचा डोस घेणे शक्य झाले.
ज्यांना लसीकरण केंद्रावर जाणे शक्य नाही, असे दिव्यांग तसेच ज्येष्ठ नागरिक यांची पूर्वनोंदणी करून घेऊन सौरभ मलुष्टे यांनी उपलब्ध केलेली व्हॅन नागरिकांपर्यंत आरोग्य खात्याच्या स्टाफसह नेली जाणार आहे.जि. प. आरोग्य विभागाच्या सहकार्याने सौरभ मलुष्टे राबवित असलेल्या ‘लसीकरण ऑन व्हील’ उपक्रमाचे ज्येष्ठ नागरिकांनी स्वागत केले. यासाठी युवा उद्योजक सौरभ मलुष्टे यांना मराठी पत्रकार परिषदेचे माजी जिल्हाध्यक्ष पत्रकार हेमंत वणजू, दीपक कुवळेकर आदींचे सहकार्य लाभले.दरम्यान ही मोबाईल व्हॅन शहराप्रमाणे लगतच्या ग्रामीण भागात देखील नेण्याची मागणी दिव्यांग तसेच ज्येष्ठ नागरिकांनी केली आहे.
मोबाईल व्हॅन लसीकरण उदय बने यांची महत्वपूर्ण भूमिका
मोबाईल व्हॅनद्वारे ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण हा उपक्रम राबवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते, युवा उद्योजक सौरभ मलुष्टे यांनी पुढाकार घेतला, यासाठी जिल्हा परिषद उपाध्यक्ष उदय बने यांनी महत्वाची भूमिका पार पाडली. उदय बने यांनी यापूर्वी ही लोकहितार्थ अनेक निर्णय घेतले आहे. जिथे सर्वसामान्य लोकांचा हिताचा विषय असतो तिथे उदय बने नेहमी मदतीसाठी पुढे असतात. जेष्ठ नागरिकांना लसीकरणासाठी त्रास होऊ नये म्हणून जेव्हा सौरभ मलुष्टे यांनी संकल्पना मांडली तेव्हा उदय बने यांनी मलुष्टे यांना शाबासकीची थाप दिली आणि तुझ्यासारखे उमदे कार्यकर्ते समाज सेवेसाठी पुढे यायला हवे आम्ही आहोतच सोबत असे प्रोत्साहन ही दिले. कोणताही विचार न करता लगेच ही संकल्पना उचलून धरली आणि आज त्याची अंमलबजावणीही शहरात सुरू झाली आहे. या उपक्रमाचे रत्नागिरीतच नव्हे तर संपुर्ण राज्यात कौतुक होत आहे.