आतापर्यंत 9 हजार 573 रुग्ण तर 313 मृत्यू
रत्नागिरी:- एप्रिल आणि मे या दोन महिन्यात रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला. त्यात सर्वाधिक बाधितांची नोंद रत्नागिरी तालुक्यात आहे. आतापर्यंत तालुक्यात 9 हजार 573 बाधित सापडले असून 313 जणं मृत पावले आहेत. मे महिन्यात शंभरच्या सरासरीने रुग्ण सापडत असल्यामुळे रत्नागिरी तालुका हॉटस्पॉट बनला आहे.
जिल्ह्याचे मुख्य ठिकाण म्हणून रत्नागिरी तालुक्याकडे पाहीले जाते. पहिल्या लाटेत या तालुक्यातील रुग्णांची संख्या कमी होती. जिल्ह्यातील मुख्य कोविड रुग्णालय रत्नागिरी शहरात असल्यामुळे बाहेरील सर्व रुग्णांची नोंद येथे केली जाऊ लागली. तसेच परजिल्ह्यातून अनेक लोकांचा राबता वाढू लागल्यामुळे बाधितांचा आलेख वर चढू लागला. दुसर्या लाटेत रत्नागिरी, चिपळूण हे दोन तालुके हॉटस्पॉट बनलेले आहेत. गेल्या दहा दिवसात शंभरच्या सरासरीने बाधित सापडत आहेत. इतर तालुक्यात संख्या कमी रत्नागिरी हॉटस्पॉट बनलेला आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य विभागाकडून प्रयत्न सुरु आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून आतापर्यंत जिल्ह्यात 33 हजार 239 जणं बाधित आले. त्यात एकट्या रत्नागिरी तालुक्यात 9 हजार 573 जणांचा समावेश आहे. अजुनही प्रत्येक दिवशी हा आकडा वाढतच आहे. रुग्णांबरोबरच मृतांची संख्याही अधिक आहे. जिल्ह्यात एकुण मृत पावलेल्या 1 हजार 098 जणंपैकी 313 रत्नागिरी तालुक्यातीलच आहेत. याबाबत आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार रत्नागिरी तालुक्यात चाचण्यांची संख्या सर्वाधिक आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांबरोबर मोबाईल व्हॅन आणि रत्नागिरीतील दोन केंद्रात दिवसाला दीडशे अॅण्टीजेन आणि 300 आरटीपीसीआर चाचण्यात होतात. अधिक चाचण्यांमुळे बाधित सापडत आहेत.









