रत्नागिरी:- कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन येथील आरोग्य यंत्रणेने आपत्कालीन परिस्थितीमध्ये एका व्हेंटिलेटरवर 2 रुग्ण ठेवण्याचा प्रयोग यशस्वी केला आहे. मात्र या रुग्णांच्या प्रकृतीची समस्या समान असणे आवश्यक आहे. फिजिशियननी दोन्ही रुग्णांची समान परिस्थिती पाहून नागपूरच्या धर्तीवर येथील महिला रुग्णालयामध्ये हा प्रयोग करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी त्याला दुजोरा दिला.
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे. वाढते रुग्ण आणि जेमतेम सुविधा यामध्ये सांगड घालण्याचे काम प्रशासन आणि आरोग्य विभाग करत आहे. महामारीतून बाधितांना वाचविण्याचा आरोग्य यंत्रणा शर्थीचे प्रयत्न करीत आहे. एकुण बाधितांपैकी चार, पाच टक्के रुग्णांना आयसीयु, व्हेंटिलेटर आवश्यक आहे. त्याचा विचार करता व्हेंटिलेटरची संख्या कमी पडत आहे. मात्र यावरही आरोग्य यंत्रणेने आणि प्रशासनाने पर्याय शोधला आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचा प्रयोग करण्यात येत आहे. त्या धर्तीवर जिल्ह्यात एका व्हेंटिलेटरवर दोन रुग्ण ठेवण्याचा प्रयोग येथील महिला रुग्णालयात सुरू आहे. आपत्काली परिस्थितीचा विचार करून अशा प्रकारे रुग्णांना जीवदान देण्याचा हा प्रयत्न आहे.
अत्यवस्थ रुग्णांचे जीव वाचवताना व्हेंटिलेटरची गरज असते. आपत्कालीन परिस्थितीत एका व्हेंटिलेटरवर दोन समान प्रकृती असणाऱ्या रुग्णांवर हा प्रयोग करण्यात आला आणि तो आरोग्य कर्मचाऱ्यांनी यशस्वी केला आहे. एकाच व्हेंटिलेटरवर काही वेळासाठी दोन रुग्णांना आधार देणे शक्य झाले आहे. यासाठी व्हेंटिलेटरच्या नळ्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत. आयसीयुमधील कर्मचाऱ्यांनी हा प्रयोग केला आहे. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी याला दुजोरा देत आरोग्य कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.
महिला रुग्णालयामध्ये एकाच व्हेंटिलेटरवर दोन रुग्ण ठेवण्याचा आमचा प्रयोग यशस्वी झाला आहे. सर्व रुग्णांवर हे शक्य नाही. मात्र ज्या रुग्णांचा संसर्ग सारखा, ऑक्सिजनची गरज सारखी, फुफुसाचे इन्फेक्शन सारखे असेल तर ते शक्य होते.-लक्ष्मीनारायण मिश्रा (जिल्हाधिकारी रत्नागिरी)