ट्रक- बोलेरो पिकअपची समोरासमोर धडक; चालक गंभीर जखमी

लांजा:- ट्रक आणि बोलेरो पिकअपमध्ये समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात बोलेरो चालक गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान मुंबई-गोवा महामार्गावर लांजा नर्सिंग क्वार्टर्स येथे घडली. जखमी चालकाला अधिक उपचारासाठी रत्नागिरी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मालवण ते रत्नागिरी ट्रक चालक गणेश नीळकंठ खोटे (४९, रा. नाचणे, रत्नागिरी) हा आपल्या ताब्यातील ट्रक क्रमांक (एमएच ०८, डब्ल्यू ८६७७) तर मुंबई ते देवगड बोलेरो चालक आकाशकुमार शंकर गौंडा बुध्दीहाल (२०, सध्या रा. सिंधुदुर्ग, मूळगाव कर्नाटक) हा आपल्या ताब्यातील बोलेरो पिकअप क्रमांक (एमएच ०४, केएफ ७९५२) ही चुकीच्या दिशेने समोरून येणाऱ्या ट्रक वर जाऊन आदळली. शुक्रवारी सायंकाळी पाच मिनिटांचा दरम्यान मुंबई-गोवा महामार्गावर लांजा शहरातील नर्सिंग क्वार्टर्स जवळ हा अपघात घडला.

या अपघातात बोलेरो पिकअप चालक आकाशकुमार बुध्दीहाल हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर लांजा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी त्याला रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.