जीवनावश्‍यक वस्तू खरेदीच्या नावाखाली नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर

रत्नागिरी:- कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी आदेश लागू केला आहे. मात्र गेल्या चार दिवसांपासून ज्या प्रमाणे जिल्ह्यातील प्रमुख शहरे आणि परिसरात नागरिकांची गर्दी दिसत आहे. यावरून संचारबंदी कायदा धाब्यावर बसविला जात असल्याचे चित्र आहे. संचारबंदीच्या काळात जास्त रुग्ण वाढले आहेत. मग ही कसली संचारबंदी, असा सवाल आता नागरिक उपस्थित करू लागले आहेत. त्यामुळे संचारबंदीच्या आदेशाच्या अंमलबजवाणीकडे बोट दाखविले जात आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. बाधितांची संख्या कमी होण्याचे नाव घेईल. वारंवार होणाऱ्या गर्दीमुळे कोरोना संसर्ग वाढत आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदीमध्ये सकाळी 7 ते 11 या दरम्यान जीवनावश्‍यक वस्तू खरेदीसाठी सवलत दिली. परंतु या सवलतीचा गैरफायदा घेतला जात असल्यानेच दिसत आहे. संचारबंदी म्हणजे विनाकारण कोणीही घरातून बाहेर पडायचे नाही. मात्र गेल्या चार ते सहा दिवसांपासून संचारबंदी कायदाच नागरिकांनी धाब्यावर बसविल्याचे चित्र आहे.

जीवनावश्‍यक वस्तू सोडून सुद्धा अन्य खरेदीसाठी नागरिक घराबाहेर पडत आहेत. शहरातील दुकाने बंद आहेत. तरीही नागरिक बाहेर पडत आहेत. काही दुकानदार मागल्या दाराने वस्तू विकत असल्याचीही चर्चा आहे. जेव्हापासून संचारबंदी लागू केली आहे, तेव्हापासून बाधितांची संख्या कमी येण्याऐवजी वाढताना दिसत आहे. संचारबंदीची कडक अंमलबजवाणी झाली तरच वाढती रुग्णसंख्या रोखणे शक्‍यत आहे. मुख्य बाजारपेठ, गोखले नाका येथील आंबा खरेदीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणात बाहेर पडले होते.