उपाध्यक्ष उदय बने; जि. प. चे पथक तैनात
रत्नागिरी:- गाव, वाड्यांमधील ग्रामस्थ कोविड बाधित होत आहेत. त्यांच्या तपासण्या करण्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे पथक त्या गाव किंवा वाडीत तपासणीसाठी जाणार आहे. कोणत्याही ग्रामस्थाला तपासणीसाठी रत्नागिरीत यावे लागणार नाही. जेणेकरुन रत्नागिरीतील कोविड तपासणी केंद्रावर गर्दी टाळली जाईल आणि कोविडचा प्रसार रोखला जाईल, असे जिल्हा परिषद उपाध्यक्ष उदय बने यांनी सांगितले.
कोरोना रुग्ण वाढत असून ग्रामीण भागात सुविधा उपलब्ध नाहीत. याचा आढावा घेण्यासाठी उपाध्यक्ष बने यांनी नुकताच जिल्हा दौरा आयोजित केला होता. यामध्ये काही प्राथमिक आरोग्य केंद्रांसह उपजिल्हा रुग्णालयांना भेटी दिल्या होत्या. त्यानंतर जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी यांच्यासह सर्व आरोग्य विभागाच्या अधिकार्यांची बैठक झाली. यावेळी उपाध्यक्ष उदय बनेही उपस्थित होते. त्यात सविस्तर चर्चा झाली. त्यात गाव पातळीवर तपासण्यांचा फंडा राबविण्यावर लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. अनेक गावातील ग्रामस्थांना कोविडची लक्षणे दिसल्यानंतर तपासणीसाठी कोठे जायचे हा प्रश्न निर्माण होतो. रत्नागिरी किंवा अन्य तपासणी केंद्रावर यायचे झाले तर वाहतूकीच्या साधनांचा अभाव आहे. एकाच वेळी गावातील किंवा वाडीतील लोक तपासणीसाठी गर्दी करतात. त्यामधून कोरोनाचा प्रसारही होऊ शकतो. ही गर्दी टाळण्यासाठी महत्त्वपूर्ण चर्चा झाली. एखाद्या गावात, वाडीत ग्रामस्थांना कोविडची लक्षणे आढळली तर त्यांनी आरोग्य विभागाशी संपर्क साधावा. त्यांची तपासणी करण्यासाठी आरोग्य विभागाचे एक पथक त्या गावात पोहोचेल. त्या रुग्णांची तपासणी करुन पुढील उपचार किंवा निर्णय घेतला जाईल असे बने यांनी सांगितले.









