जीआय नोंदणीकृत बागायतदारांना मिळाला क्यू आर कोड 

रत्नागिरी;- भौगोलिक निर्देशांक (जीआय) घेतलेल्या आंबा बागायतदारांना प्रायोगिक तत्त्वावर क्यु आर कोड देण्यास सुरवात झाली आहे. त्याचे सकारात्मक परिणाम दिसत आहेत. पारदर्शकतेबरोबरच बनावटगिरीला आळा बसल्याचा अनुभव बागायतदार डॉ. विवेक भिडे आणि सलील दामले यांनी व्यक्त केले.

बाजारपेठेत हापूसची कर्नाटक आंब्यात होणारी भेसळ रोखण्यासाठी भौगोलिक निर्देशांक (जीआय) प्राप्त बागायतदारांना फळावर लावण्यासाठी क्यू आर कोड वितरित करण्यात आले. यंदा एक लाख लोगो वितरीत केल जाणार आहेत. रत्नागिरीतील दोन बागायतदारांनी प्रत्येकी दहा हजार लोगो घेतले होते. 220 ते 350 ग्रॅम वजनाच्या फळावर हा लोगो लावून ते बाजारात पाठवण्यात आले. ग्राहकांकडून या बदलासंदर्भात विचारणाही होऊ लागली आहे. रत्नागिरी हापूसच्या नावे दुसर्‍या जातीचे आंबे विक्री केले जातात. दर अधिक मिळवण्यासाठी हा फंडा राबवण्यात येतो. ही बनावटगिरी टाळणे शक्य होत आहे. याबाबत मुंबई, पुण्यातील ग्राहकांकडून प्रतिसाद मिळाल्याचे श्री. दामले यांनी सांगितले. तसेच लोगोवरुन ते फळ कोणाच्या बागेतून आले आहे, याची माहितीही मिळते. फळ खराब झाले तरीही त्याची माहीती मिळू शकते. त्यामुळे पारदर्शकता निर्माण होणार आहे. दामले यांनी 220 ते 240 ग्रॅम वजनाचे पाच हजार आंबे लोगो लावून बाजारात वितरीत केले होते. या वजनाच्या आंब्यात साका होत नसल्याने याची निवड केली आहे. स्थानिक बाजाराबरोबरच कतार, सिंगापूरलाही त्यांनी बाजारात पाठवला आहे. त्याचबरोबर डॉ. विवेक भिडे यांनी दहा हजार आंबे लोगो लावून पाठवले आहेत.
त्यात 250, 300, 350 ग्रॅम वजनाचे फळ बाजारात पाठवले होते.