रत्नागिरी:- तालुक्यातील फणसवळे मधलीवाडी येथे मोकळ्या जागेत लागलेली आगीचे वणव्यात रुपांतर झाले. यामध्ये आंबा, काजूची शेकडो झाडे भस्मसात झाली असून सुमारे सहा लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. हा प्रकार शुक्रवारी (ता. 16) सायंकाळच्या सुमारास घडला.
मधलीवाडी येथील सुदेश मेस्त्री यांच्या आंबा, काजूच्या बागेला काल सायंकाळी अचानक आग लागली. मेस्त्री मुंबईला गेलेले होते. आगीचे कारण समजू शकले नाही; मात्र आग विझवण्याचे आव्हान होते. आग लागल्याचे लक्षात आल्यानंतर मेस्त्री यांनी तत्काळ पोलिस यंत्रणेसह स्थानिक प्रशासनाला दुरध्वनीवरुन संपर्क साधला होता; मात्र प्रशासनाकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. आगीचे वृत्त समजताच गावातील लोकं घटनास्थळी जमा झाली. पालिकेचा दुरध्वनी न उचलल्यामुळे एमआयडीसीतील फायर ब्रीगेडरकडे फोन केला. पैसे भरुन बंब घटनास्थळी पाठविण्याची तयारीही संदेश मेस्त्री यांनी केली होती. बंब निघाला परंतु मिरजोळे पाटीलवाडी येथील रस्त्यात तो बंद पडला. आग विजवण्यासाठीच्या प्रयत्नात खंड पडला होता. शेवटचा प्रयत्न म्हणून ग्रामस्थांनी घराजवळ बोअरवेलचे पाणी पाईपद्वारे सोडून दिले. तसेच शेजारच्या बागेतील विहीरीवरुन पाणी आणून त्याद्वारे आग विझवण्यास सुरवात केली. परंतु रात्रभर ती आग धुमसतच होती. रात्री आठ वाजेपर्यंत सर्वचजणं यामध्ये गुंतलेले होते. आग विजेपर्यंत संदेश मेस्त्री यांच्या जागेतील आंबा, काजूची झाडे जळून भस्मसात झाली होती. ऐन हंगामाच्या तोंडावर हा प्रकार घडला. मेस्त्री यांच्याबरोबरच आजूबाजूच्या बागेतही आग पसरल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.