महिला रुग्णालयातील प्रकार; नातेवाईकांची नाराजी
रत्नागिरी:- जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने रत्नागिरी शहरातील सर्व शासकिय रुग्णालये फुल्ल झाली आहेत. गुरुवारी सकाळपासून पॉझिटिव्ह रुग्ण महिला रुग्णालयात बसवून ठेवण्यात आले आहेत. शहरात आरोग्य विभागाकडे बेडच उपलब्ध नसल्याचे धक्कादायक वास्त आहे. यामुळे रुग्णांचे आरोग्य धोक्यात येणार आहे. रुग्णालयात पोहचूनही उपचार मिळणार नसतील तर रुग्णालयात जायचे कशाला असा सूर रुग्णांच्या नातेवाईकांनी काढला आहे.
गेल्या पाच दिवसात रुग्ण संख्येत मोठी वाढ झाली आहे. सर्वाधिक जास्त रुग्ण रत्नागिरी तालुक्यात असल्याने त्याचा थेट परिणाम आरोग्य यंत्रणेवर झाला आहे. जिल्हा रुग्णालयासह महिला रुग्णालय , बीएड कॉलेज, सामाजिक न्याय भवन येथील बेड फुल्ल झाले आहे. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाला महिला रुग्णालयात पाठविण्यात येत आहे.
तालुक्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रातून रुग्ण महिला रुग्णालयात दाखल होत आहे.गुरुवारी सकाळी महिला रुग्णालयात दाखल झालेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना तळमजल्यावर बसवून ठेवण्यात आले आहे. त्यामध्ये गरोदर मातेसह लहान मुलाचा समावेश आहे.संध्याकाळ पर्यंत त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले नव्हते. त्यातील काहि रुग्णांना रुग्णालय प्रशासनाने सायंकाळी जेवण दिले. उपचार अभावी असलेल्या रुग्णांना दिवसभर उपाशीच राहावे लागले.
वाढत्या रुग्ण संख्येच्या तुलनेत रुग्णालये, कोरोना सेंटर उपलब्ध नसल्याने आरोग्य विभागाची तारांबळ उडाली आहे. तर उपचारांस बेड मिळत नसल्याने रुग्णांचे नातेवाईक आक्रमक झाले आहे. रुग्ण वाढीची संख्या कायम राहिल्यास नागरिकांचा उद्रेक होण्याची शक्यता आहे.









