शाळेत पाच वर्षे पूर्ण झालेला शिक्षक बदलीस पात्र 

रत्नागिरी:- एका शाळेत शिक्षकाची सेवा पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतरच तो बदलीस पात्र होणार आहे. बदलीस पात्र विशेष संवर्ग 1 व 2 मधील शिक्षकांनी बदलीचा लाभ घेतल्यानंतर त्यांना पुढील 3 वर्षे विनंती बदलीसाठी अर्ज करता येणार नाही. तीस शाळांचा पसंती क्रम बदलीसाठी द्यावा लागणार आहे. याशिवाय अवघड क्षेत्रातील शाळा घोषित करण्यासाठी निकष जाहीर केले आहेत.

विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता, घटणारी पटसंख्या, शिक्षकांना काम करण्यात येणार्‍या समस्या, अध्यापनातील स्थैर्य या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत ऑनलाईन बदल्या प्रणाली नुकतेच शासनाने सुधारीत धोरण जाहीर केले आहे. त्यामुळे 1 ते 31 मे अखेर बदल्या होणार असल्याने जिल्ह्यातील बदलीपात्र शिक्षकांच्या हालचालीना वेग आला आहे. गेल्या काही वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत बराच गोंधळ होत होता. त्याच पार्श्वभूमीवर राज्याच्या ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांबाबत सुधारीत धोरण जाहीर केले आहे. मात्र नव्या धोरणातही शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत आणि आंतरजिल्हा बदल्या ऑनलाईन पध्दतीनेच होणार आहेत. त्यासाठी आधीच्या काही नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. परंतू आंतर जिल्हा बदलीसाठी सध्याच्या जिल्हा परिषदेचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक असल्याची अट कायम ठेवण्यात आली आहे. यापूर्वी जिल्हाअंतर्गत बदल्यांबाबत अवघड क्षेत्र कोणते यासाठी काही निकष ठरवण्यात आले होते. त्यातील निकषाची पुर्तत: करणारे क्षेत्र अवघड मानले जाईल. जिल्हाअंतर्गत बदल्यांसाठी संवर्ग निश्चित करण्यात आले आहेत. जिल्हा परिषद शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीसाठी आता एकाऐवजी चार जिल्ह्याचा आणि 20 ऐवजी 30 शाळांचा पर्याय देता येणार आहे. वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये कार्यरत असणार्‍या पती पत्नीला आंतरजिल्हा बदलीसाठी अर्ज करायचा असल्यास दोघांपैकी एका जिल्ह्याचा पर्याय निवडता येईल. पती पत्नी वेगवेगळ्या जिल्ह्यात असल्यास आणि त्यांना तिसर्‍या जिल्ह्यात बदली हवी असल्यास दोघांपैकी कनिष्ठ असलेल्यांची सेवाज्येष्ठता गृहीत धरली जाईल. बदलीसाठी शिक्षकांना ऑनलाईन अर्जाऐवजी गटशिक्षणाधिकार्‍याकडे अर्ज करावा लागणार आहे.