रत्नागिरी:- जिल्हा परिषद उपाध्यक्ष पदाची निवड सोमवारी (ता. 5) होणार आहे. त्यासाठी शिवसेनेने उदय बने यांच्या नावावर शिक्कामोर्तब आधीच झाले असल्यामुळे निवडीची औपचारीकताच पार पाडण्यात येणार आहे.
जिल्हा परिषद अध्यक्षपदासह सभापतींची निवडणुक काही दिवसांपुर्वी झाली. महेश नाटेकर यांनी उपाध्यक्षपदाचा राजीनामा सादर केल्यामुळे उपाध्यक्षपदासाठी निवडणुक होणार आहे. अध्यक्षपदी विक्रांत जाधवांच्या नियुक्तीनंतर प्रमुख दावेदार असलेले शिवसेनेचे ज्येष्ठ सदस्य उदय बनेंना कसे शांत करणार याबाबत उत्सुकता होती. अध्यक्षपदासाठी कोणतेही आरक्षण नसल्यामुळे बने यांना शेवटच्या सव्वा वर्षासाठी संधी दिली जाईल असा अंदाज होता; परंतु थेट मातोश्रीवरुन विक्रांत जाधव यांचे नाव पुढे आल्याने उर्वरित इच्छुकांचा हिरमोड झाला. त्या बनेंचा समावेश होता. प्रामाणिक काम करणार्या निष्ठावंत शिवसैनिकांना डावलल्याचा ठपका राहू नये यासाठी पक्षाकडून बने यांना उपाध्यक्षपदासह आरोग्य व बांधकाम सभापती पदाची अतिरिक्त जबाबदारी देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सोमवारी प्रत्यक्षात कार्यवाही होणार आहे. उद्या सकाळी 10 ते 12 या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करावयाचा आहे. त्यानंतर दुपारी 2.30 ते 3.30 या कालावधीत छाननी, माघारीची प्रक्रिया पार पडेल. पुढे आवश्यकता भासल्यास निवडणूक घेण्यात येणार आहे. निवडीनंतर बांधकाम व आरोग्य समितीची धुरा त्यांच्याकडे सोपवण्यात येईल. तसेच स्थायी समिती सदस्यांचीही नावे जाहीर केली जातील.