एलईडीचा वापर करणाऱ्या चार नौकांवर कारवाई

रत्नागिरी:- एलईडी दिव्याद्वारे होणार्‍या बेकायदेशीर मासेमारीविरोधात सहायक मत्स्य आयुक्त कार्यालयाकडून जोरदार मोहीम सुरू आहे. त्या अनुषंगाने दोन दिवसात मत्स्य विभागाने चार नौकांवर कारवाई करून सुमारे 17 लाखाचे एलईडी साहित्य जप्त केले आहे. चारही नौका जप्त केल्या असून एक जयगड बंदरात तर तीन मिरकरवाडा बंदरात ठेवल्या.

एलईडी दिव्याचा वापर करुन होणार्‍या मासेमारी विरोधात सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त ना. वि. भादुले यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम सुरू आहे. परवाना अधिकारी जयगड स्मितल कांबळे, सुरक्षा रक्षक परिमल परशुराम मळेकर व सर्वेश प्रभाकर आडविरकर यांनी गस्ती दरम्यान ही कारवाई केली. नौकेवर एलईडीने मासेमारी करण्याचे साहित्य मिळाले. त्यामुळे निलेश दगडु पाटील (रा. साखरीआगार ता. गुहागर) यांची नौका कृपा आई स्वामी नोंदणी क्र.आयएनडी-एमएच-4-एमएम-3887 हीचेवर सापडले. या नौका मालकावर महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनियम 1981 अंतर्गत खटला दाखल केला आहे. नौकेवरील एलईडी लाईट्सचे साहित्य जप्त केले असून रत्नागिरी तहसीलदार यांच्या कोर्टाच्या पुढील आदेशापर्यंत नौका जप्त करून जयगड बंदरात उभी केली आहे.

संयुक्त कारवाई सहायक मत्स्य आयुक्त भादुले यांच्या मार्गदर्शनाखाली र. प्र. राजम, मिरकरवाडा बंदर प्राधिकरण  सं. अ. देसाई, प. अ. गुहागर,  प्र. ल. महाडवाला, प. अ. नाटे, दी. आ. साळवी, प. अ. दाभोळ  तृ. ध. जाधव, सुरक्षा पर्यवेक्षक तुषार करगुटकर, 11 सुरक्षा रक्षक व 2 पोलिस कर्मचारी यांनी संयुक्तपणे केली. 

मत्स्य विभागाने गस्ती नौका माऊली साईद्वारे धडक तपासणी मोहीम सुरू ठेवली. त्या अंतर्गत मिरकरवाडा बंदरातील नौकांची संयुक्त तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान तेहसिन मर्यम, खादिजा सानिया, अलआरोष या तीन नौकांवर एलईडीचा वापर केल्याबद्धल कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये 108 एलईडी लाईट, 4 बलार्ड, होल्डर व वायर असे सुमारे 17 लाख किमतीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. तीनही नौकांवर जप्तीची ककारवाई करून त्या मिरकरवाडा बंदरामध्ये लावून ठेवल्या आहेत.