रत्नागिरी:– फागपंचमीपासून जिल्ह्यात सुरू झालेला शिमगोत्सवाचा उत्साह गावोगावी दिसून आला. मात्र, कोरोना रुग्णांमध्ये होणाऱ्या प्रचंड वाढीमुळे निर्बंध अधिक कडक करण्यात आल्याने चाकरमान्यांसह गावातील पालखी नाचविण्याच्या उत्साहावर मात्र विरजण पडले. रविवारी तेरसे शिमगे शांततेत आणि नियमात साजरे करण्यात आले. त्यात कोरोनापासून रक्षण करून त्याचा नायनाट कर, अशा फाका देवीसमोर घालून होम पेटविण्यात आला. बारा वाड्यांचा श्री देव भैरी मानात सहाणेवर विराजमान झाला आहे.
सोमवारपासून रत्नागिरीतील प्रसिद्ध भैरीबुवाचा शिमगोत्सवही साधेपणाने साजरा करण्यात येईल. फेब्रुवारीत कोरोना रुग्णांची संख्या हातावर मोजण्याइतकीच असल्याने चाकरमान्यांसह गावांमध्ये शिमगोत्सवाची तयारी जोरात सुरू होती. गेल्या वर्षी लॉकडाउनमुळे अनेक ठिकाणी शिमगोत्सवाचा उत्साह नव्हता. त्यामुळे यावर्षी दणक्यात उत्सव साजरा करण्याची तयारी झाली होती. परंतु, मार्च उजाडताच कोरोना रुग्णांमध्येही वाढ झाली. तरीही देवस्थानांनी उत्सवाची तयारी केली. मात्र त्यांच्या उत्साहावर विरजण पडले.
गेल्या आठवडाभरात रुग्णांची संख्या चौपट झाल्याने शिमगोत्सवातील प्रमुख पालखी नाचविणे, होळी आणणे आदींवर प्रशासनाने मर्यादा आणल्याने या उत्सवातील रंगत निघून गेल्याने ग्रामस्थ नाराज झाले आहेत. तेरसे शिमगे शांततेत साजरे करण्यात आले. यात ढोल-ताशांचा गजर होता; पण त्यात उत्साह कमी आणि परंपरा पूर्ण करायच्याच, एवढेच उद्दिष्ट होते.
दरम्यान, प्रशासनाने पालखी घरोघरी नेण्यासही बंदी घातल्याने सगळीकडे शिमगोत्सव शांततेत सुरू आहे. भैरीबुवाचा शिमगोत्सव सोमवारी साजरा होणार असून, त्याची मिरवणूकही मर्यादित उपस्थितीत रथातून काढण्यात येईल.
श्री देव भैरी सहाणेवर विराजमान
रविवारी रात्री बारा वाजता मंदिरातून दरवर्षीप्रमाणे भैरी बुवाची पालखी बाहेर पडली. रथावर विराजमान होत भैरीबुवा सहाणेवर विराजमान झाले. ज्या रस्त्यावर गाडी जाणे शक्य नाही, तेथेच पाय वाटेने लोकांच्या खांद्यावरून पालखी नेण्यात आली. ठराविक अंतर ठेवून हुलपे घेण्यात आले. हुलपे घेताना सॅनिटाईज करुन घेण्यात आले. या प्रसंगी कोणालाही पालखी जवळ येण्यास बंदी होती. होळी ही यंदा उंचीने लहान असून काही ठराविक लोकांच्या उपस्थितीत झाडगाव येथील सहाणेवर उभी करण्यात येणार आहे. लोकांनी गर्दी करू नये शक्य असेल तर ऑनलाईनच दर्शन घेण्याचे आवाहन देवस्थान ने केले आहे.