कोरोना संकटामुळे होलिकोत्सवावर मर्यादा

रत्नागिरी:- फाल्गून पंचमीला म्हणजेच पहिल्या होळीला सुरुवात झाली असून, यंदा मात्र कोरोनाच्या सावटामुळे उत्सव साजरा करण्यावर मर्यादा आल्या आहेत. देवतांच्या पालख्या, घरोघरी नेणे, नाचवणे आदी कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. असे असले तरी उत्सवाचा उत्साह मात्र कमी झालेला नाही.

शिमगोत्सव आणि कोकण यांचे अतूट नाते आहे. कोकणात ज्याप्रमाणे गणेशोत्सवाची धूम असते, तसाच उत्साह शिमगोत्सवातही असतो. मुंबईत नोकरी-व्यवसायानिमित्त गेलेले सर्व चाकरमानी शिमगोत्सवाला आवर्जून हजेरी लावतात. संपूर्ण कोकणात हा उत्सव एकाचवेळी साजरा होत असला तरी प्रत्येक गावाची प्रथा-परंपरा वेगळी आहे.
शिमगोत्सवात पहिले 9 दिवस हे वाडीतील होळीचे असतात. त्यानंतर दहाव्या दिवशी गावचा सार्वजनिक होम होतो. वाडीतील बालगोपाळ मंडळी संध्याकाळी एकत्र येऊन वाजतगाजत होळीखुंटावर होळी आणतात. रात्री आट्या-पाट्या, कबड्डी असे खेळ होतात. त्यानंतर होळी पेटविण्यासाठी लागणारे गवत, कवळ, लाकडे असे साहित्य जमा केले जाते. त्यानंतर देवाच्या नावाने हाळ्या देत होळीभोवती फेर मारून होळी पेटविली जाते. यावेळी वाडीतील लहानथोर मोठ्या उत्साहाने सहभागी होतात.

दहाव्या दिवशी आंब्याचे झाड तोडणे, ते नाचवत होळीच्या ठिकाणी नेऊन होम पेटवला जातो. त्याआधी ग्रामदेवतेला रूपं लावण्याचे काम होते. शिमगोत्सव म्हणजे मानपानाचा सण असतो. ग्रामदेवतेची पालखी सजविल्यानंतर ती मुख्य होळीसाठी सहाणेवर आणली जाते.
मुख्य होमाच्या दिवशी होळीभोवती पालखी नाचविली जाते. काही गावांतून पौर्णिमेला म्हणजे दहाव्या दिवशी मुख्य होम असतो तर काही गावांचा होम हा पौर्णिमेच्या दुसर्‍या दिवशी असतो. यालाच ‘भद्रेचा शिमगा’ असे म्हणतात. तिसर्‍या दिवशी ज्या गावातून मुख्य होम असतो, त्याला ‘तेरसा शिमगा’ असे म्हटले जाते. होळीनंतर पालखी एक दिवस सहाणेवर विराजमान होते. त्यानंतर ती ठरल्याप्रमाणे मानकरी व वाडीतील इतर घरांमध्ये दर्शनासाठी नेली जाते.