रत्नागिरी:- कोरोना प्रादुर्भावामुळे सन 2021च्या शिमगा उत्सवामध्ये रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री देव भैरीची पालखी बारा वाड्यांमध्ये ज्या मार्गाने जाते त्या मार्गावरून पालखी रथामधून ग्रामप्रदक्षिणा करेल. ज्या ठिकाणी रथ जाऊ शकणार नाही तेथे पालखी खांद्यावरून नेण्यात येणार आहे. ग्रामप्रदक्षिणा आणि सहाणेवर पालखी कोठेही खेळवण्याचा कार्यक्रम होणार नसल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष रवींद्र ऊर्फ मुन्ना सुर्वे यांनी दिली
मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेवेळी त्यांच्या सोबत दिनेश सावंत, अंकुश शिवलकर, दीपक कीर, राजन जोशी, प्रकाश पिलणकर, विकास मयेकर, प्रकाश घुडे, राजन फगरे, जितू भोंगले, बाळकृष्ण शिवलकर आदी उपस्थित होते.
शासनाचे नियम पाळून यंदा भैरी देवस्थानचा शिमगोत्सव शांततेत व सुरळीत पणे साजरा करण्याचा निर्णय नुकत्याच्य झालेल्या 12 वाड्याच्या बैठकीत घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. पौर्णिमेच्या दिवशी सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत भैरी मंदिर उघडे राहणार आहे. नंतर कोणालाही मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. देवळाच्या बाहेर बॅरिकेटस् लावली जाणार आहेत.जाकिमिर्या व सडामिर्या येथील पालख्या या देवळात भेटणार नाहीत.पण भैरी मंदिरात त्यांच्या सोयीनुसार देवाची भेट घेऊ शकतात. तसेच रात्री बारा वाजता मंदिरातून दरवर्षीप्रमाणे भैरी बुवाची पालखी बाहेर पडेल. रथाच्या गाडीवर विराजमान होणार असून, कोणाला खांद्यावर पालखी घेता येणार नाही किंवा नाचवता येणार नाही. पण ज्या रस्त्यावर रथ जाणे शक्य नाही तेथेच पाय वाटेने लोकांच्या खांद्यावरून वाहून नेली जाईल.
भैरीच्या पालखीच्या नगर प्रदर्शनाच्या वेळी उलपे स्वीकारले जाणार नाहीत. पौर्णिमा ते धुलीवंदन या कालावधीत सहाणेवर ओटी भरता येईल. सहाणेवर पालखी बसल्या नंतर ठराविक अंतर ठेवून उलपे घेण्यात येणार आहेत. शिमगोत्सवापूर्वी दोन दिवस अगोदर बारा वाड्यात रिक्षा फिरवून याची कल्पना भाविकांना देण्यात येणार आहे. तसेच होळी ही यंदा उंचीने लहान असून, काही ठराविक लोकांच्या उपस्थितीत झाडगावं येथील सहाणेवर उभी केली जाणार आहे.
भैरीच्या भेटीसाठी गावागावातून पालख्या येतात. शासनाने 50 जणांच्या उपस्थितीची मर्यादा घालून दिल्याने त्या पालख्यांबरोबर येणार्या ग्रामस्थांपैकी 25 जण आणि भैरी देवस्थानचे 25 जण अशा 50 जणांना मंदिरात प्रवेश देण्यात येणार असल्याचेही सुर्वे यांनी यावेळी सांगितले.









