रनपच्या नोटीसीला स्थगिती देण्याची मागणी; रनपकडून कॅव्हेट दाखल
रत्नागिरी:- शहरातील मारूती मंदिर येथील छत्रपती शिवाजी स्टेडियममधील 11 गाळे पाच दिवसात ताब्यात देण्याची नोटीस नगर परिषदेने बजावली. ही नोटीस मिळाल्यानंतर त्या नोटीसला स्थगिती मिळवण्यासाठी गाळेधारकांनी न्यायालयात धाव घेतली आहे. रत्नागिरी नगर परिषदेतर्फे कॅव्हेट दाखल केलेले असल्याने रनपच्या वकीलांना येत्या सोमवारी (ता.15) बाजू मांडण्यास सांगण्यात आले आहे.
छ.शिवाजी स्टेडियममधील रनपच्या मालकीचे मुदत संपलेले 11 गाळे ताब्यात घेण्यासाठी काही दिवसांपूर्वी रनपच्या मालमत्ता विभागाने प्रयत्न केले. तत्पूर्वी गाळेधारकांना तोंडी सांगून गाळे ताब्यात देण्यास सूचित केले होते. गाळेधारकांकडून प्रतिसाद न मिळाल्याने मालमत्ता विभागाच्या पथकाने हे गाळे ताब्यात घेण्यासाठी गाळ्यांच्या ठिकाणी गेले. परंतु सोबत पोलिस बंदोबस्त नसल्याने आणि लेखी नोटीस नसल्याने गाळेधारकांनी या पथकाला दाद दिली नाही. गाळे ताब्यात घेण्यास गेलेल्या पथकाने त्यानंतर नियोजनबद्ध कार्यवाही सुरू केली.गाळे ताब्यात घेण्यासाठी कारवाई करण्यास जाताना पोलिस बंदोबस्त मिळावा, यासाठी आवश्यक असलेली कागदपत्र शहर पोलिसांना देण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानंतर 9 मार्च रोजी गाळेधारकांना नोटीस देवून गाळे पाच दिवसात ताब्यात देण्याची समज देण्यात आली. गाळे ताब्यात न दिल्यास महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायती, औद्योगिक नगरी अधिनियमातील तरतूदीनुसार कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा नोटीसद्वारे देण्यात आला. सर्वांना नोटीस मिळाल्यानंतर गाळेधारक नोटीसच्या कार्यवाहिला स्थगिती मिळवण्यासाठी न्यायालयात जाण्याची शक्यता ओळखून रनपचे वकील अॅड.निलांजन नाचणकर यांच्या मार्फत कॅव्हेट दाखल करण्यात आले.
गाळेधारकांनी शुक्रवारी न्यायालयात जाऊन रनपच्या नोटीसला स्थगिती देण्याची विनंती केली. रनपची बाजू ऐकून घेण्यासाठी दाखल केलेल्या कॅव्हेटनुसार न्यायालयाने रनपला येत्या सोमवारी बाजू मांडण्यास सांगितले आहे. गाळेधारकांना दिलेल्या नोटीसला स्थगिती मिळू नये यासंदर्भात अॅड.निलांजन नाचणकर लेखी म्हणणे देवून त्यासंदर्भात युक्तीवाद करणार आहेत. छ.शिवाजी स्टेडियममधील 11 गाळ्यांची मुदत संपली आहे. मुदत संपल्यानंतर हे गाळे ताब्यात घेण्यासाठी कार्यवाही सुरू झाली.









