जिल्ह्यात शिमगोत्सव कसा साजरा करावा…जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचना जाहीर

रत्नागिरी:- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिमगोत्सवाकरीता मुंबई पुण्यावरुन नागरीक येण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करता यावर्षी रत्नागिरी जिल्ह्यात शिमगोत्सव, होळी उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने मार्गदर्शक सूचना रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी प्रसिद्ध केल्या आहेत.

ऐन शिमगोत्सवात रत्नागिरी जिल्ह्यात रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होत आहे. शिमगोत्सवाकरीता मुंबई, पुण्यावरुन नागरीक येण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करता यावर्षी शिमगा उत्सव, होळी उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी सुचना निर्गमित केल्या आहेत. मंदिर विश्वस्त आणि पालखीधारक यांनी कोरोना चाचणी करणे बंधनकारक आहे. मोजक्या लोकांच्या उपस्थितीतच ग्रामदेवतेच्या पालखीची रुपे लावणे, सजविणे करावीत. 25 ग्रामस्थ आणि मानकर्‍यांच्या उपस्थितीत पालखी परंपरेनुसार भेट होईल. पालखी शक्यतो वाहनातून नेल्यास योग्य राहील, ते शक्य नसल्यास पालखी धारकांनी स्वतः वाहून न्यावी. पालखीबरोबर 50 पेक्षा अधिक लोकांनी जमू नये. गर्दी टाळण्यासाठी पालखी दर्शनाच्या वेळा निर्धारीत करुन घ्याव्यात. होळी व पालखीची पुजा, नवस, पेढे, हार, नारळ आदी स्विकारु नयेत आणि प्रसादाचे वाटप करु नये. सहाणेवर पालखी आणि होळीच्या दर्शनासाठी प्रत्येक वाडीतील, भागातील लोकांना स्वतंत्र दिवस नेमून दयावा किंवा कालावधी निश्‍चित करावा. हे करताना सामाजिक अंतर, मास्क बंधनकारक आहे. याचे उल्लंघन केल्यास स्थानिक प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई केली जाईल. हे करताना थर्मल स्क्रिनिंग, हॅण्ड सॅनिटायझर सुविधा ठेवावी.

मुंबईतील ग्रामस्थांनी शक्यतो गावी न येण्याचे आवाहन करावे. तसेच होळीच्या कार्यक्रमाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, फेसबुक व वेबसाईट आदी माध्यमांव्दारे उपलब्ध करुन द्यावी. जेणेकरुन गावी न येणार्‍या चाकरमान्यांना होळीचा कार्यक्रम पाहणे शक्य होईल. मुंबई, पुणे किंवा अन्य भागातील प्रतिबंधित क्षेत्रामधून (कंटेन्मेंट झोन) रत्नागिरी जिल्हयात होळीसाठी येणार्‍या नागरीकांकडे 72 तासांपुर्वीची कोरोना टेस्ट निगेटिव्ह असल्याचा अहवाल आवश्यक आहे. प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील लोकांना एसपीओ 2 चाचणी व थर्मल स्क्रिनिंग बंधनकारक राहील. त्याकरीता नागरी व ग्रामकृती दल यांनी शाळा अथवा अन्य सार्वजनिक ठिकाणी स्क्रिनिंग सेंटर उभारावेत. या स्क्रिनिंग सेंटरबाबत फलकाद्वारे जनजागृती करावी. या केंद्रांवर सर्दी, खोकल्या सारखी लक्षणे आढळल्यास त्यांना जवळच्या आरोग्य केंद्रात पाठवावे. त्याप्रमाणे सर्दी, खोकला व इतर कोरोना सदृश्य लक्षणे असल्यास कोणत्याही नागरीकास शिमगोत्सवात सामील होता येणार नाही. ही जबाबदारी नागरी व ग्रामकृती दलांकडे सोपवण्यात आली आहे. पन्नास पेक्षा अधिक लोकांची गर्दी झाल्यास, आदेशाचे उल्लंघन केल्यास आणि कोरोनाचा शिरकाव मोठया प्रमाणात दिसून आल्यास ते क्षेत्र प्रतिबंधित म्हणून घोषित केेले जाईल.