74 हजार मतदार ठरवणार रत्नागिरीचा नवा नगराध्यक्ष

रत्नागिरी:- आगामी पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी शहराची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये सुमारे ७४ हजाराच्यावर मतदार आहेत. त्यापैकी ७ हजार ५०० मतदारांवर हरकती दाखल करण्यात आल्या होत्या. याबाबत पालिकेने स्थळ पाहणी करून हरकती निकाली काढल्या. तशी मतदार यादीमध्ये दुरूस्ती करण्यास सांगितली आहे.

साडेतीनशे मतदारांवर आक्षेप असून, त्यांना पालिकेने बाजू मांडण्यासाठी नोटिसा बजावली होती. त्याची आज प्रांताधिकारी जीवन देसाई यांच्याकडे सुनावणी झाली. त्यानुसार मतदार यादीमध्ये बदल करून ३१ ऑक्टोबरला अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे.
रत्नागिरी विधानसभा मतदार संघाच्या यादीवरच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपनेते बाळ माने यांनी आक्षेप घेतला आहे. सुमारे २३ हजार मतदार बोगस असल्याचा दावा त्यांनी केला. पुराव्यानिशी त्यांनी ही सर्व माहितीवजा तक्रार जिल्हा निवडणूक विभागाकडे केली. त्यानंतर रत्नागिरी शहरातही मोठ्या प्रमाणात बोगस मतदार असल्याची तक्रारही त्यांनी केली होती.

या दरम्यान, पालिकेने शहरातील मतदारांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली. सुमारे ७४ हजारावर मतदार आहेत. यासाठी हरकती मागवण्यात आल्या.
शहरातील ७ हजार ५०० मतदारांबाबत पालिकेकडे हरकती दाखल झाल्या. यामध्ये अनेक मतदार या प्रभागातील दुसऱ्या प्रभागात, जिथे राहतो त्या प्रभागात नावच नाही अशा तक्रारी होत्या. काही ठिकाणी पालिकेच्या चुकीमुळे एका प्रभागातील मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागात लागली होती. पालिकेने हरकतींचा अभ्यास करून अनेक ठिकाणी स्थळपाहणी केली. त्यानुसार यादीमध्ये सुधारणा सुचवण्यात आल्या आहेत. आता साडेतीनशे मतदारांवर हरकती घेण्यात आल्या आहेत. त्यांना पालिकेने नोटीस बजावली आहे. त्यांची आज प्रांताधिकारी जीवन देसाई यांच्याकडे सुनावणी झाली. त्यांना बाजू मांडण्याची संधी दिली. त्यानंतर ३१ ऑक्टोबरला रत्नागिरी शहराची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.