55 हजार 845 वीज ग्राहकांचा महावितरणला ठेंगा 

लॉकडाऊनमध्ये बिल भरलेच नाही; वसुलीचे आव्हान 

रत्नागिरी:- टाळेबंदीच्या काळातील वीज बिलांमध्ये सवलत देण्याच्या आश्‍वासनावरून शासनाने घुमजाव केले. कोणतीही सवलत न देता वीज बिल वसूल केले जाणार, असे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी जाहीर केल्याने वीज ग्राहकांना मोठा ‘झटका’ बसला आहे. जिल्ह्यात गेल्या आठ महिन्यांमध्ये 55 हजार 845 ग्राहकांनी बिल भरलेलेच नाही. त्यामुळे महावितरणची थकबाकी 33 कोटी 75 लाख 65 हजारवर पोचली तर एकूण थकबाकी 81 कोटी 31 लाखावर गेली आहे.

वीजबिलांमध्येही सवलत मिळण्याची ग्राहकांची मगाणी होती. कंपनीने एकदम तीन महिन्याची बिले काढली. अव्वाच्यासव्वा बिल आल्याने ग्राहकांना शॉक बसला. चुकीच्या पद्धतीने बिलं आल्याचा ग्राहकांचा दावा होता; मात्र महावितरण कंपनी बिल योग्य असल्याचे वारंवार सांगत होते. लोकांच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन वीज बिल माफ करण्याचा शासनाचा विचार असल्याचे सांगण्यात आले. सवलत मिळणार असे मानून आठ महिन्यांमध्ये ग्राहकांनी वीज बिल भरण्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे जिल्ह्याच्या आढाव्यात मोठी थकबाकी पुढे आली.
जिल्ह्यात गेल्या आठ महिन्यात एकही बिल न भरणार्‍या ग्राहकांची विभागनिहाय थकबाकी अशी – चिपळूण विभागात गेल्या आठ महिन्यांमधील 15 हजार 719 ग्राहकांचे 10 कोटी 1 लाख 29. खेड विभागात 16 हजार 4 हजार ग्राहकांचे 9 कोटी 16 लाख तर रत्नागिरी विभागात 23 हजार 708 ग्राहकांचे 14 कोटी 59 लाख 66 हजार असे एकूण 55 हजार 845 ग्राहकांची 33 कोटी 75 लाख 65 हजार. थकबाकी वसुलीसाठी महावितरणने हप्त्यांची सवलत, ग्राहकांना पत्र पाठविणे, भेटीगाटी सुरू आहेत. बिल न भरल्यास गरज भासल्यास वीज जोडणी तोडण्याचा इशारा दिला आहे.

एकूण थकबाकीदार 1 लाख 52 हजार 27 घरगुती, वाणिज्य आणि लघुउद्योजकांचीही मोठी थकबाकी आहे. यामध्ये चिपळूण विभागातील 41 हजार 85 ग्राहकांची 22 कोटी 25 लाख 68 हजार थकबाकी आहे. खेडची 41 हजार 187 ग्राहकांचे 22 कोटी 12 लाख 31 हजार थकीत आहेत. रत्नागिरी विभागातील 69 हजार 782 ग्राहकांचे 36 कोटी 93 लाख 1 हजार थकबाकी आहे. एकूण 1 लाख 52 हजार 27 ग्राहकांकडून 81 कोटी 31 लाख 30 हजार थकबाकी आहे.