रत्नागिरी:- ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 13 ऑक्टोबर 2022 रोजी मतदान होणार आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील 51 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. बुधवारपासून (ता. 7) आचारसंहिता लागू झाल्याचे निवडणूक विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे.
राज्यातील 18 जिल्ह्यांतील 82 तालुक्यांमधील 1 हजार 166 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम आज निवडणुक आयोगाकडून जाहीर करण्यात आला. यामध्ये संबंधित तालुक्यातील तहसीलदार 13 सप्टेंबरला निवडणुक नोटीस प्रसिद्ध करतील. नामनिर्देशनपत्र 21 ते 27 सप्टेंबर या कालावधीत दाखल करण्यात येतील. शनिवार व रविवारच्या सुट्टीमुळे 24 व 25 सप्टेंबर 2022 रोजी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार नाही. याची छाननी 28 सप्टेंबरला होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर ला दुपारी 3 वाजेपर्यंत असेल. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. मतदान 13 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मतमोजणी 14 ऑक्टोबर 2022 रोजी होईल. समर्पित मागासवर्ग आयोगाने शिफारस केलेल्या टक्केवारीच्या प्रमाणात या निवडणुकांसाठी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा ठेवायच्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये मंडणगड 2, दापोली 4, खेड 7, चिपळूण 1, गुहागर 5, संगमेश्वर 3, रत्नागिरी 4, लांजा 15 व राजापूर 10 यांचा समावेश आहे.
गणेशोत्सवाची धामधूम संपत आली असतानाच ग्रामपंचायतींचा निवडणुक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे निवडणुक लागलेल्या ग्रामपंचायतींमध्ये रणधुमाळी सुरु होणार आहे. राज्यात शिवसेनेमध्ये सुरु असलेल्या ठाकरे-शिंदे गटातील वादाचा परिणामही या निवडणुकीत दिसून येणार आहे. शिंदे गटात असलेले खेड-मंडणगड-दापोलीचे आमदार योगेश कदम यांच्या विधानसभा मतदारसंघात 13 तर उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील 4 ग्रामपंचायतीत चुरस पहायला मिळणार आहे. या ठिकाणी शिंदे सेना बाजी मारणार की ठाकरे सेना याकडे सर्वांचेच लक्ष लागणार आहे.









