चक्रीवादळात झाली होती हानी, महावितरण कर्मचाऱ्यांकडून युद्धपातळीवर काम
रत्नागिरी:- 3 जून रोजी आलेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात संपूर्ण जिल्हा सापडला. या चक्रीवादळात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले महावितरणचे. 628 गावातील यंत्रणा कोलमडून पडली. मात्र महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी कोरोना महामारीत देखील युद्धपातळीवर काम करत 50 दिवसात 628 गावांमधील वीज पुरवठा पूर्ववत केला.
कोकण किनारपट्टीला निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसला. या तडाख्यात वीज वितरण कंपनीची यंत्रणा अक्षरश: भुईसपाट झाली. 47 उपकेंद्रे बंद पडली. 5 हजार 708 रोहित्र जमीनदोस्त झाली. परिणामी रत्नागिरी जिल्ह्यातील 628 गावांचा वीजपुरवठा ठप्प झाला. गुहागर, मंडणगड व दापोली या तीन तालुक्यांना सर्वाधिक फटका बसला. एकप्रकारे अर्धा जिल्हाच अंधारात गेला होता. त्यात कोकणात व विशेष करुन चक्रीवादळ बाधित भागात कोरोनाचा प्रार्दुभाव मोठ्या प्रमाणात झाला होता.
बाधित झालेली सर्व 47 उपकेंद्रे व 628 पैकी 500 गावे 15 जूनला सुरु झाली. वीजपुरवठा सुरुळीत करताना आधी उच्चदाब वाहिन्या व त्यानंतर लघुदाब वाहिन्यांना प्राधान्य देण्यात आले. उर्वरित गावे सुरु करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत कर्मचारी काम करत होते. काम करताना पावसाशी व न दिसणाऱ्या कोरोनाशीही लढत होते. 25 जुलै रोजी सर्व गावे सुरु झाली. त्यासाठी या 50 दिवसांत तब्बल 9 हजार 187 विजेचे खांब 5 हजार 697 रोहित्रे उभे करावी लागली.