रत्नागिरी:-5 सप्टेंबर रोजी होणाऱ्या गौरी गणपती विसर्जन आणि 9 सप्टेंबर अनंत चतुर्थी दिवशी मांडवी येथील भुते नाका ते मांडवी समुद्र किनारा हा मार्ग खाजगी वाहनांसाठी बंद राहणार आहे. केवळ गणपती विसर्जनासाठी येणाऱ्या वाहनांना या ठिकाणी प्रवेश दिला जाणार आहे. याबाबतचा मनाई आदेश जारी करण्यात आला आहे.
गणपती विसर्जनासाठी मांडवी किनारी मोठी गर्दी होते. शहरातील प्रत्येक भागातून अनेकजण मांडवी समुद्र किनारी हजेरी लावतात. विसर्जन सोहळा पाहण्यासाठी अनेकजण मांडवी जेट्टी वर हजेरी लावतात. विसर्जन दिवशी गर्दी होऊन वाहतूक कोंडी होऊ नये आणि विसर्जन सोहळा निर्विघ्न पार पडावा यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष नियोजन केले आहे.
विसर्जनच्या दिवशी भुते पान शॉप ते मांडवी समुद्र किनारा या दरम्यान मांडवी समुद्र किनारी विसर्जन ठिकाणी गणपती मुर्ती घेवून येणाऱ्या वाहनांव्यतिरिक्त अन्य वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे. याशिवाय समुद्र किनारी असलेल्या हातगाडया , खेळण्यांची दुकाने मांडण्यास बंदी घालण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 ( 4 ) नुसार पोट – कलम ( 1 ) अन्वये अधिकारात हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.