तालुक्यात 34 गावातील नळपाणी योजनेच्या कामाला वेग

रत्नागिरी:- मागील अनेक वर्षापासून ग्रामीण भागात भेडसावणाऱ्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी रत्नागिरी शहरानजीकच्या 34 गावांसाठी पाणीपुरवठा करण्यासाठी 123 कोटी 30 लाखांच्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे काम वेगाने सुरु आहे. त्यासाठी कोल्हापूर टाईप दोन धरणांची कामे 80 टक्के पूर्णत्वास गेले आहे. येत्या पावसाळ्यापूर्वी ते पूर्ण करून पाणीसाठा करण्यासाठी जीवन प्राधिकरण विभागाची धावपळ आहे. तर या योजनेतून शिल्लक राहिलेल्या पाईपलाईनची कामे व पाण्याच्या टाक्यांची कामे पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

या योजनेमधून एकूण प्रत्येक गावासाठी अशा 34 टाक्यांची उभारणी होणार आहे. त्यातील काही टाक्यांसाठी अजूनही जागांचा प्रश्न असून तो सोडवण्यासाठी जीवन प्राधिकरणामार्फत जिल्हाप्रशासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. पण त्यापैकी आता शहरानजीकच्या शिरगाव-आडी येथील पाण्याच्या टाकीचा प्रश्न शिल्लक राहीला आहे. तोही लवकरात लवकर मार्गी लागणार असल्याचे सांगण्या आले आहे. खेडशी ते डि मार्ट या अंतरातील पाईपलाईन मिर्‍या – नागपूर महामार्गाच्या उजव्या की डाव्या बाजूने नेण्याबाबता प्रश्न आहे. त्यावर विचारविनिमय करून हा प्रश्न देखील मार्गी लावण्यात येणार आहे. वेळवंड गावात 3 किलोमीटर अंतरातील पाईपलाईन टाकण्यावरून ग्रामस्थांच्या काही तक्रारी होत्या, त्यावर देखील तोडगा काढून निर्माण झालेला प्रश्न मार्गी लागणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

या प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी धावपळ सुरू आहे. 123 कोटी 30 लाख रुपयांची ही नळपाणी योजना आहे. योजनेचे काम 50 टक्के पूर्ण झालेले आहे. त्यासाठी तालुक्यातील वळके मराठवाडी व साठरे ठोंबरेवाडी येथे कोल्हापूर टाईप बंधार्‍यांची उभारणीचे काम 80 टक्के पूर्णत्वास गेलेले आहे. योजनेच्या एकूण 160 कि.मी. अंतराच्या जलवाहिन्या टाकण्यात येणार आहे. त्या जलवाहिन्यांचे 70 कि.मी.चे काम पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे रत्नागिरी शहरालगतच्या गावांचाही पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

मिर्‍या, शिरगाव, नाचणे, खेडशी, मिरजोळे, कारवांचीवाडी, हातखंबा ते निवळी तिठापर्यंतच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या गावांचा समावेश यात करण्यात आला आहे. मागील काही वर्षात साळवी स्टॉप ते निवळी तिठापर्यंत शहरीकरण वाढत असून लोकवस्तीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे त्यांना सुविधा देण्यासाठी पालकमंत्री सामंत यांनी विशेष लक्ष दिले आहे. या योजनेसाठी बावनदीवर वळके मराठवाडी येथे 6 मीटर उंच कोल्हापूर टाईप बंधारा बांधला जात आहे. त्यानंतर भविष्यातील मागणी विचारात घेऊन आणखी पाण्यासाठी साठरे ठोंबरेवाडी नजीक दुसरा बंधारा बांधला जाणार आहे. या धरणांवर 13 मीटर व्यास व 13 मीटर खोलीची जॅकवेल उभारली जाणार आहे. त्याठिकाणी 270 हॉर्सपॉवरच्या तीन पंपातून सुमारे 7 किलोमीटर अंतरावर वेळवंड येथे जलशुद्धीकरण केंद्रात पाणी आणून ते पुढे आणले जाणार आहे. मिर्‍या, शिरगाव, निवळी, हातखंबा, नाचणे, अशा 37 गावांना पुरविले जाणार आहे. ही योजना मार्गी लावण्यासाठी एकुण 34 पाण्याच्या टाक्या बांधण्यात येत आहेत. आतापर्यंत 16 टाक्यांचे काम पूर्ण झाले आहे. 7 टाक्यांची कामे प्रगतीत आहेत. उर्वरित टाक्या बांधण्याच्या कामाला प्रारंभ झालेला आहे. लवकरच त्या टाक्यांची काम सुरू होतील असे याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणा मार्फत सांगण्यात आले आहे.

पाणी योजनेत सहभागी गावे

या पाणी योजनेत जाकीमिर्‍या, मिर्‍या, सडामिर्‍या, आडी, मुसलमानवाडी, शिरगाव, तिवंडेवाडी, झाडगाव, निवळी, रावणंगवाडी, धनावडेवाडी, काजरेकोंड, कपिलनगर, करबुडेकोंड, करबुडे, कुंभारवाडा, मुळगाव, वेद्रेवाडी, डांगेवाडी, हातखंबा, तारवेवाडी, घवाळवाडी, पानवल, खेडशी, पोमेंडी, कारवांचीवाडी, कुवारबाव, मधलीवाडी, मिरजोळे, पाडावेवाडी, शीळ, ठिकाणदाते, आंबेशेत, नाचणे, जुवे, कर्ला, मुस्लिमवाडी या गावांचा समावेश आहे. योजनेचे काम 50 टक्के शिल्लक आहे.