रत्नागिरी:- कोरोना लसीकरण मोहीम वेगाने राबविण्यासाठी आरोग्य यंत्रणा कार्यरत असून ३० सप्टेंबरला एका दिवसात विक्रमी मात्रा देण्यात आल्या. जिल्ह्यात १६० विविध लसीकरण केंद्रावर पहिला व दुसरा मिळून ३५ हजार ९३९ जणांना डोस देण्यात आले.
दुसर्या लाटेचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत असून दरदिवशी सापडणारे बाधितांचा आकडाही घटलेला आहे. मृत्यूदरही आटोक्यात असून बरे होणार्यांचा टक्का वाढला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी कोव्हॅक्सीन आणि कोव्हीशिल्ड या दोन लसी नागरिकांसाठी उपलब्ध करुन दिल्या जात आहेत. राज्य शासनाकडून सुरवातील कमी लस मिळत होती; मात्र सध्या लसीचा योग्य प्रमाणात पुरवठा सुरु आहे. काल एका दिवसात २६ हजार १२३ जणांना पहिला डोस देण्यात आला. तर ९ हजार ८१६ जणांना दुसरा डोस दिला गेला. दिवसभरात ३५ हजार ९३९ जणांना डोस देण्यात आले. पुणे येथून दिवसाला मिळणार्या डोसची संख्याही वाढत आहे. १८ वर्षांवरील ११ लाख नागरिकांना लस देण्याचे लक्ष्य निश्चित आहे. आतापर्यंत ७ लाख ३१ हजार १६१ जणांना पहिला आणि ३ लाख १७ हजार ७२१ जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. आतापर्यंत १० लाख ४८ हजार ८८२ जणांचे लसीकरण झालेले आहे.