25 टक्के राखीव जागेसाठी जिल्ह्यातील 95 शाळांची निवड

रत्नागिरी:- बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षण अधिकार अधिनियमानुसार वंचित व दुर्बल घटकातील मुलांसाठी खासगी विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित व स्वयं अर्थसहाय्य मान्यता असणार्‍या शाळेत पूर्व प्राथमिक किंवा पहिलीमध्ये प्रवेशाच्या 25 टक्के राखीव जागेसाठी जिल्ह्यातील 95 शाळांची निवड करण्यात आली असून, त्यामध्ये 864 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. 21 मार्चपर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करण्याचे आवाहन जिल्हा परिषद शिक्षण विभागाने केले आहे.

अधिनियम 2009 मधील कलम 12 नुसार वंचित व दुर्बल घटकातील मुला-मुलींसाठी खासगी विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित व स्वयं अर्थसहाय्य मान्यता असणार्‍या पूर्व प्राथमिक किंवा पहिलीमध्ये प्रवेशाच्या 25 टक्के जागा रिक्त ठेवण्याची तरतूद आहे. ही प्रक्रिया 3 मार्चपर्यंत सुरू झाली असून, 21 मार्चपर्यंत सुरू असणार आहे.

या प्रवेशासाठी जिल्ह्यातील 95 शाळांनी नोंदणी केली असून, निकषानुसार पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. एकूण 864 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. दिलेल्या कालावधीत पालकांनी ऑनलाईन अर्ज सादर करायचे आहेत. पालकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन जि. प. शिक्षण अधिकारी निशादेवी वाघमोडे यांनी केले आहे.

विद्यार्थ्याचा जन्म दाखला, जातीचा दाखला, उत्पन्नाचा पुरावा, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 40 टक्के किंवा जास्त प्रमाणाचे अपंगतत्वाचे प्रमाणपत्र आवश्यक, निवासी पुरावा हे कागदपत्र आवश्यक असणार आहेत. त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज दाखल करताना जास्तीत जास्त 10 शाळा निवडता येणार आहे. त्यापैकी एक शाळा दिली जाऊ शकते. अचूक व खरी माहिती भरणे आवश्यक. अर्ज भरला म्हणजे प्रवेश झाला नाही. ऑनलाईन लॉटरी झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांनी त्यांच्या आरटीई लॉगीनमध्ये तात्पुरते प्रवेश दिले जाणार आहेत, आदी निकष असणार आहेत.