रत्नागिरी:-कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलं आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. अशातच कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यातील झपाट्यानं वाढणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या लक्षात घेऊन राज्यातील निर्बंध अधिक कठोर करण्यात आले आहेत. राज्यात आज (22 एप्रिल) रात्री आठपासून ब्रेक द चेन अंतर्गत अधिक कडक निर्बंधांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. 22 एप्रिल ते 1 मे पर्यंत हे निर्बंध लागू असणार आहेत. ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत आज रात्री 8 वाजल्यापासून लागू होणारी सुधारित नियमावली प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहे. नव्या नियमावलीमध्ये अनेक कठोर निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. या नियमावलीत लग्न सोहळ्यांसाठीही नवे निर्बंध जारी केले आहेत. या नव्या निर्बंधांनुसार, आता लग्नसमारंभ केवळ 2 तासांत आटपावा लागणार आहेत. तसेच 25 जणांच्या उपस्थितीत लग्न उरकावं लागणार आहे.









