जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण 81 टक्क्यांवर
रत्नागिरी:- जिल्ह्यात रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण वाढून 80.79 टक्क्यांवर पोचले आहे. मागील 24 तासात तब्बल 116 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यामुळे जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णसंख्या सात हजार पार पोचली आहे. तसेच नव्याने तीन रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 240 वर पोचली आहे.
जिल्ह्यात नव्याने सापडलेल्या 116 रुग्णांमध्ये आरटीपीसीआर टेस्ट केलेले 82 तर अँटिजेन टेस्ट केलेल्या 34 रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक 34 रुग्ण सापडले आहेत. याशिवाय दापोली 2, खेड 16, गुहागर 11, चिपळूण 27, संगमेश्वर 11, लांजा 13 आणि राजपुर तालुक्यात 2 रुग्ण सापडले आहेत.
जिल्ह्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 7 हजार 70 वर पोचली आहे. मागील 24 तासात 320 जणांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला असून आतापर्यंत 34 हजार 901 जणांचा अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाला आहे. मागील 24 तासात 374 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत 5 हजार 712 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 81 टक्क्यांवर आहे.
दरम्यान मागील चोवीस तासात तीन रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. यात रत्नागिरीतील एक तर चिपळूण तालुक्यातील दोन रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. आता पर्यंत 240 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असून जिल्ह्याचा मृत्युदर 3.39 टक्के आहे.