23 ते 24 जानेवारीला कोकणात पाऊस पडण्याची शक्यता

रत्नागिरी:- प्रशांत महासागराबरोबरच अरबी समुद्रातील पाण्याचे तापमान वाढत असल्यामुळे मे महिन्यापर्यंत सतत अवकाळी पावसाचा सामना करावा लागणार आहे. सध्या बदलत्या वातावरणामुळे 23 ते 24 जानेवारीलाही कोकणात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. याला हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी दुजोरा दिला आहे.

जागतिकस्तरावर ला-निना ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. प्रशांत महासागराचे तापमान वाढल्याचा हा परिणाम असल्याचे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे. गतवर्षी 15 मे रोजी तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसला. त्यानंतर मोसमी हंगामातही अतिमुसळधार पाऊस झाला. परतीचा पाऊसही ऑक्टोबरपर्यंत होता. पुढे नोव्हेंबर, डिसेंबर आणि वर्षाच्या सुरुवातीला जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात अवकाळीची नोंद झाली. हा जोर पुढे कायम राहिल असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविलेला आहे. ला निनो परिस्थिती निर्माण झाल्यानेच हवामान बदलले आहे. कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढत असून हा ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम आहे. बदलत्या हवामानामुळे रत्नागिरी जिल्ह्यात 23 आणि 24 जानेवारी या दोन दिवसात पावसाची शक्यता वर्तविली आहे. पुढेही प्रत्येक महिन्यात अवकाळी पाऊसाचा सामना करावा लागणार असल्याचे डॉ. साबळे यांनी सांगितले.

अवकाळी पावसाचा परिणाम कोकणातील आंबा बागायतदारांना होत आहे. पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे किडरोगांचा प्रादुर्भाव होतो. त्याला सामोरे जाताना बागायतदारांना कसरत करावी लागते. पावसाचा अंदाज घेऊन शेती आणि फळबागायतीचे नियोजन करावे असा सल्ला सध्या शेतीतज्ज्ञ डॉ. साबळे यांनी दिला आहे.