Thursday, October 8, 2026
spot_img
Home शैक्षणिक 228 पैकी 210 शिक्षकांची कागदपत्र पडताळणी पूर्ण

228 पैकी 210 शिक्षकांची कागदपत्र पडताळणी पूर्ण

पवित्र पोर्टलद्वारे शिक्षण सेवक भरती

रत्नागिरी:- जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून शासनाच्या पवित्र पोर्टलद्वारे सुरू असलेल्या पदवीधर शिक्षण सेवक भरती प्रक्रियेतील कागदपत्र पडताळणीचा टप्पा पूर्ण झाला आहे. इंग्रजी आणि गणित या विषयांसाठीच्या या भरतीसाठी 228 उमेदवारांना पडताळणीसाठी बोलावण्यात आले होते, त्यापैकी 210 उमेदवार उपस्थित होते, तर 18 उमेदवार अनुपस्थित राहिले.

राज्य शासनाच्या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून ही संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवली जात आहे. यापूर्वी गुणवत्ता यादी आणि प्राधान्यक्रम निश्चित झाल्यानंतर पात्र उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी जिल्हा परिषदेत बोलावण्यात आले होते.

जिल्हा परिषदेच्या सभागृहात शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रिया पार पडली. यावेळी उमेदवारांची पदवी प्रमाणपत्रे, बी.एड., टीईटी, सीटीईटी, जात, अधिवास, नॉन क्रिमिलेअर यासह सर्व मूळ कागदपत्रांची सखोल तपासणी करण्यात आली. गटशिक्षणाधिकारी व शिक्षण विभागाच्या पथकाने ही पडताळणी केली.

पडताळणीत पात्र ठरलेल्या 210 उमेदवारांना लवकरच समुपदेशन प्रक्रियेद्वारे शाळा निवडीची संधी देऊन नियुक्तीपत्रे देण्यात येणार आहेत. त्यानंतर संबंधित उमेदवारांना त्यांना मिळालेल्या शाळांवर रुजू व्हावे लागणार आहे. या भरतीमुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जि.प. शाळांमधील इंग्रजी व गणित विषयाच्या शिक्षकांची मोठी उणीव भरून निघणार आहे.

दरम्यान, अनुपस्थित राहिलेल्या 18 उमेदवारांबाबत पवित्र पोर्टलच्या पुढील सूचनेनुसार निर्णय घेण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.