विकास कामे सुरु तरीही शासनाकडून आर्थिक पिळवणूक

ठेकेदारांकडून 27 जून रोजी सा. बां. कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा

रत्नागिरी:- मागील आर्थिक वर्षात राज्यात जवळपास एक लक्ष कोटीची विकास कामे सुरु असून, ठेकेदारांनी दहा कोटी रुपये अनामत रक्कम शासनाकडे जमा केलेली आहे. अनेक विकास कामे सुरु असताना, या झालेल्या कामांचे पैसे मिळत नसल्याने ठेकेदारांची आर्थिक पिळवणूक होऊ लागली असून ठेकेदारांसह कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने यात तातडीने लक्ष न घातल्यास राज्यभर 27 जून रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा दिला आहे. रत्नागिरीतही याबाबत आंदोलनाचे निवेदन ठेकेदारांनी दिले आहे.

राज्यासह रत्नागिरी जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागासह ग्रामविकास, जलजीवन मिशन, जलसंधारण सारख्या अनेक योजनांची गतवर्षी एक लाख कोटीची विकास कामे सुरु आहेत. अनेक छोटेमोठे कंत्राटदार ही कामे करीत आहेत. मात्र कंत्राटदारांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यास शासनाला वेळ नसल्याचे दिसून आले आहे. ठेकेदारांच्या प्रश्नाबाबत वेळावेळी निवेदन देऊनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे.

विकास कामे करणार्‍या ठेकेदारांची देयके तातडीने देण्यात यावीत. यावर कंत्राटदार, त्यांच्याकडे कामे करणारे कामगार, अन्य व्यावसायिक यांची वर्षानुवर्ष देयके रखडली जात आहेत. त्यामुळे आर्थिक ओढाताण होत असून, उपासमारीची वेळ आली आहे. शासन विविध विभागाची कामे मंजूर करीत असताना, निधीची उपलब्धता करते, त्यामुळे यापुढे निधीची उपलब्धता असल्याशिवाय कामे करु नयेत अशी मागणीही ठेकेदारांनी केली आहे.
यासह अनेक मागण्यांबाबत पत्र व्यवहार करण्यात आला आहे. मात्र याबाबत शासनाने कार्यवाही केली नाही तर 27 जून रोजी राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सर्व कार्यालयांसमोर राज्यातील सर्व संघटना आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत रत्नागिरीतही आंदोलन होणार असल्याचे पत्र येथील ठेकेदारांनी बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांना दिले आहे.